राज्यभरातील शिक्षकांच्या निवडश्रेणी आणि वरिष्ठश्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठीच्या प्रणालीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे प्रणाली दोन ते तीन दिवसांसाठी बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) इन्फोसिस स्प्रिंगबोर्डच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी ९४ हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. १ जूनपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार ते पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र गुरुवारपासून प्रशिक्षणाच्या प्रणालीवर अडचणी येत असल्याचे, लॉगीनच होत नसल्याचे शिक्षकांनी निदर्शनास आणून दिले. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्ययावतीकरण करत असल्याने प्रशिक्षणाची प्रणाली वापरण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच काही शिक्षकांना त्यांचा विषय प्रशिक्षणासाठी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विषयच उपलब्ध नसल्यास प्रशिक्षण पूर्ण करून उपयोग काय असा प्रश्नही संबंधित शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला.
प्रणालीवर लॉग ईनच होत नसल्याने प्रशिक्षणार्थी शिक्षकांना गुरुवारी दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी सकाळीही तोच प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्याकडून प्रशिक्षणाची प्रणाली दोन ते तीन दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे ईमेलद्वारे कळवण्यात आले. आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असे स्पष्ट करून इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षणार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
ऑनलाइनचा मनस्ताप नको
गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया करावी लागली. सतत संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइल वापरून मानदुखी, पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यात आता वरिष्ठ आणि निवडश्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाइन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातील तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्यावर प्रशिक्षण पूर्ण करणे अधिक त्रासदायक होणार आहे. त्यामुळे निवड आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण प्रत्यक्षच घेण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे