पुणे : जागतिक हवामान बदलाचा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिक प्रदेशाला मोठा फटका बसत आहे. आर्क्टिक प्रदेशाने २०२३मध्ये आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. परिसरात वेगाने तापमानवाढ होत असून, परिसंस्था, मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेने अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक (नोआ) या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे.

हेही वाचा >>> अवकाळी, गारपिटीमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादकांचे १५ हजार कोटींचे नुकसान, द्राक्ष उत्पादन ४० टक्के घटण्याची भीती

नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फरिकने (नोआ) वार्षिक आर्क्टिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्या अहवालात म्हटले आहे, जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत आहे. सन २०२३ चा उन्हाळा आजवरचा सर्वांत उष्ण ठरला आहे. ग्रीनलॅण्डमधील तापमानवाढीने बर्फ वितळण्याच्या वेगाने आजवरचा उच्चांक गाठला आहे. उत्तर कॅनडातील तापमानवाढीमुळे पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सन १९०० नंतर २०२३ हे वर्ष सहावे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सन १९७९नंतर आर्क्टिक प्रदेशाचे उपग्रहाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू झाले, तेव्हापासून यंदा बर्फ वितळण्याच्या वेगाने उच्चांक गाठल्याचे, ग्रीनलँडमध्ये हिवाळ्यात जास्त बर्फ साचूनही उन्हाळ्यात कमी बर्फ राहिल्याचे आणि वेगाने बर्फ वितळल्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पतींची वाढ होऊन तो यंदा हिरवागार झाल्याची छायाचित्रे उपग्रहांनी टिपली आहेत.

हेही वाचा >>> राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ? उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून समिती नियुक्त

तापमानवाढीचा वेग ०.५ अंश सेल्सिअस

आर्क्टिक प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान प्रत्येक दशकात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानवाढ होत आहे. तापमानवाढीमुळे २५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील बर्फ वितळण्याचा धोका आहे. ही तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रणाची गरज आहे, असेही नोआने नमूद केले आहे.

नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले

आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढणे, समुद्राचे तापमान वाढणे, वाऱ्याचा वेग, प्रवाहात बदल होणे, तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळे, चक्रीवादळांच्या संख्येत वाढ होणे, अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना जगाला करावा लागत आहे.

Story img Loader