पुणे : पुढील पाच वर्षांत जागतिक तापमानवाढीचे नवे उच्चांक नोंदवले जाऊ शकतात. तापमानवाढीची १.५ अंश सेल्सियसची मर्यादा पुढील पाच वर्षांत मोडीत निघू शकेल. २०२३ ते २०२७ या पाच वर्षांपैकी एका वर्षांत जागतिक तापमान १.५ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक वाढण्याची ६६ टक्के शक्यता असल्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संस्थेने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तापमानवाढीबाबत केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. पॅरिस करारात नमूद केल्यानुसार दीर्घकालीन उष्णतेबाबत १.५ अंश सेल्सियसची पातळी कायमस्वरूपी गाठली जाईला, असे या अहवालाचे म्हणणे नाही. मात्र तात्पुरत्या काळासाठी १.५ अंश सेल्सियसची पातळी मोडीत निघण्याचा इशारा जागतिक हवामान संस्था देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आगामी काही महिन्यांत तयार होणारा एल निनो, मानव निर्मित हवामान बदल अशा घटकांमुळे जागतिक तापमानवाढ होईल. त्यामुळे पर्यावरण, आरोग्य, अन्न सुरक्षा, जल व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी, २०२२मध्ये नोंदवले गेलेले सरासरी जागतिक तापमान १८५० ते १९०० या औद्योगिक काळापूर्वीच्या कालावधीच्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सियसने जास्त होते. एल निनो विकसित झाल्यानंतर सर्वसाधारणपणे त्या पुढील वर्षी जागतिक तापमानवाढ होते. त्यामुळे २०२४मध्ये जागतिक तापमान वाढण्याची शक्यता आहे. २०१६मध्ये अतिशय तीव्र एल निनोमुळे नोंदवले गेलेले तापमानाचे विक्रम पुढील पाच वर्षांत मोडीत निघण्याची शक्यता ९८ टक्के असल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे.

सर्वाधिक उष्ण कालखंड २०१८ ते २०२२ या कालावधीत नोंदवल्या गेलेल्या तापमानापेक्षा पुढील पाच वर्षांत तापमानात वाढ होईल. तसेच २०२३ ते २०२७ हा पाच वर्षांचा एकत्रित कालावधी आतापर्यंतचा सर्वात उष्ण ठरू शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global warming news world temperatures set to reach new records in next five years zws
Show comments