पुणे : जागतिक तापमानावाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत. हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार आहेत, असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिला.
‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कुमार बोलत होते. ते म्हणाले, ‘भविष्यात नवीन रोगाच्या साथी येणार आहेत. याला प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ कारणीभूत ठरणार आहे. तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेटस्टवरील बर्फ आणि हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून गोठलेले स्थितीत असलेले जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत. ते पुढे प्राणी आणि मनुष्याच्या संपर्कात येऊन नवीन साथी येणार आहेत. आगामी काळात हा धोका वाढत जाणार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क वाढल्यानेही साथरोग पसरत आहे. याचबरोबर जागतिकीकरणामुळे जगभरात मानवाचा प्रवास वाढला असून, त्यातून रोगांचा प्रसारही होत आहे.’
‘नवीन रोगांच्या साथींना आपण प्रतिबंध करू शकत नाही. मात्र, आपण त्यांचा सामना करण्यास आता सज्ज आहोत. आपल्या काही लसी सध्या आहेत, तर काही नवीन लसींवर आपण संशोधन करीत आहोत. बर्ड फ्ल्यूवरील लस विकसित करण्याचे काम आपल्याकडून सुरू आहे. अमेरिका आणि युरोपकडे या लसीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आयसीएमआर मंकीपॉक्स, डेंग्यू, चिकुनगुन्या यावरील लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.’
‘बर्ड फ्ल्यू’चा प्राण्यांसोबत मानवाला संसर्ग
स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात सैबेरिया आणि मंगोलियातून भारतात दोन ते तीन महिन्यांसाठी येतात. त्यांच्या माध्यमातून नवीन विषाणूचा संसर्ग आपल्याकडे होतो. त्यामुळे पक्ष्यांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या मनुष्यांचे नमुने तपासण्यात येतात. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग हा पाळीव प्राण्यांमध्ये दिसून आला आहे. तेथून तो मनुष्यांमध्ये पसरत आहे. हा संसर्ग सिंह आणि मांजरांमध्येही आढळून आलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये एका लहान मुलीचा बर्ड फ्ल्यूमुळे नुकताच मृत्यू झाला. तिने कच्चे चिकन खाल्ल्याचे तपासणीत समोर आले,’ असेही डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम
‘तापमानवाढीचे गंभीर परिणाम सध्या सार्वजनिक आरोग्यावर होत आहेत. डासांमुळे अनेक आजार पसरतात. तापमानवाढीमुळे डासांचे २८ दिवसांचे जीवनचक्र २१ दिवसांवर येते आणि त्यातून त्यांची उत्पत्ती वाढते. सध्या डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे हे प्रमुख कारण आहे. याचबरोबर थंड हवेच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत नाही. परंतु, अशा ठिकाणी तापमानात वाढ होऊन डासांची उत्पत्ती होत आहे. तिथेही कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. तेथील नागरिकांना आधी असे आजार झालेले नसल्याने त्यांच्यात याची प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे हे आजार वेगाने पसरतात आणि त्यांचा मृत्यूदरही अधिक असतो,’ अशी माहिती निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
आधी रोगाचे निदान करण्याचे आव्हान आपल्यासमोर होते. आता आपण याबाबतीत स्वयंपूर्ण झाला आहोत. कोविड संकटानंतर प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झालेली आहे. सुरुवातीला जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणीची सुविधा असे. आता प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. – डॉ. नवीन कुमार, संचालक, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था