पुणे : देश विदेशातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला. दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले. मात्र शहरातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुक लांबल्याचेही स्पष्ट झाले. विसर्जन मिरवणूक सकाळी नियोजित वेळेत सुरू होऊनही सायंकाळी पाच वाजेपर्यंत मानाच्या अवघ्या दोन गणपतींचे विसर्जन झाले.
ग्रामदैवत कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या दोन मंडळांचे विसर्जन झाले. दरम्यान केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरूनही सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या नव्हत्या. सकाळी दहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. कसबा गणपती मार्गस्थ लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत केले. कला अकादमीकडून मिरवणूक मार्गांवर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विविध कलापथकांचा समावेश असलेल्या कसबा गणपतीचे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास टिळक चौकात आगमन झाले. कलावंत पथक उपस्थितांचे प्रमुख आकर्षण ठरले.
हेही वाचा : पुणे : आदित्य ठाकरे गणपती दर्शनासाठी पुण्यात
मानाचा दुसरा कसबा गणपती मंडळाचे दिमाखात आगमन झाले. सर्मथ पथकाने कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मात्र सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यत अवघ्या दोन गणपती मंडळांचे विसर्जन झाल्याने मानाच्या गणपती विसर्जन मिरवणूक उशिरा संपणार हे स्पष्ट झाले. मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार असल्याने लाखो पुणेकरांनी टिळक चौकात गर्दी केली आहे.परदेशी नागरिकांचा मिरवणुकीतीस सहभागही लक्षणीय ठरला. केळकर कुमठेकर रस्त्यासह कर्वे रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मिरवणूक अद्याप सुरू झालेली नाही. शास्त्री रस्त्यावरून काही लहान मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लक्ष्मी रस्ता टिळकक रस्ता आणि केळकर तसेच कुमठेकर रस्त्यावरून मोठ्या मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. विद्युत रोषणाई आणि भव्यदिव्य देखावे तसेच स्पीकर्सच्या भिंती या मार्गावरून येणाऱ्या मंडळांची वैशिष्ट्ये आहेत.