आपल्याकडे विचारांचा मुकाबला विचाराने करता येत नाही, हे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. डॉ.दाभोलकरांनी मांडलेला विचार नेटाने पुढे चालू ठेवणे हे समविचारी कार्यकर्त्यांसमोर खरे काम असणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विचारवंत कॉ.गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ चे डॉ.दाभोलकर संपादक होते. विचार, व्यवहार व वितरण अशा सर्व बाजूंनी साधना अधिक व्यापक करण्यामध्ये त्यांनी मोठे काम केले आहे. ते आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. जादूटोणाविरोधी कायदा व्हावा यासाठी गेली १८ वर्षे अतिशय संयमाने त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या पश्चात या कायद्याला मूर्तस्वरूप देणे हे समविचारी कार्यकर्त्यांचे काम आहे. राज्यकर्त्यांकडून हा कायदा संमत करण्याची अपेक्षा करण्यामध्ये वेडेपणा ठरेल. पण ज्यांना हा कायदा व्हावा, असे वाटते त्या सर्वानी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून प्रयत्नशील राहिले पाहिजे. मी, माझा पक्ष, संघटना यासाठी बांधील आहे. ‘अंनिस’चे कार्य पुढे चालवीत ठेवणे ही त्यांना मन:पूर्वक वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.
विचारी नागरिकांना धक्का
– माजी न्या. नरेंद्र चपळगावकर
डॉ. दाभोलकर यांच्या अमानुष हत्येमुळे महाराष्ट्रातील सर्वच विचारी नागरिकांना धक्का बसला आहे. दाभोलकर हे ‘साधना’चे संपादक म्हणून जेवढे ज्ञात होते, तेवढेच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही माहीत होते. नि:स्वार्थ सामाजिक काम हा दाभोलकरांनी घेतलेला वसा होता. विचारांचा मुकाबला विचारांनी करावा, व्यक्तिद्वेषाने नव्हे, हे तत्त्व आज विसरत चालले असल्याचे दिसते. दाभोलकरांचा विचार त्यांच्या हत्येने संपणार नाही.
अतिशय दुर्दैवी
– खा. डॉ. जनार्दन वाघमारे
डॉ. दाभोलकरांची निर्घृण हत्या अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या रूपाने एक समाजसुधारक गेला. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. या विषयावर पुस्तके लिहिली. व्याख्याने दिली. कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, हे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. ‘साधना’ चे संपादक म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी वेगळ्या उंचीवरची आहे. एक कर्तबगार माणूस गेला. त्यांची हत्या करणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी.
वैचारिक भूमिका घेऊ न शकणाऱ्यांचे हे कृत्य
– बी. जी. कोळसे-पाटील
देशाचा इतिहास पाहिला तर हिंदुत्ववाद्यांनी कधीही विचारांचे उत्तर विचाराने दिलेले नाही. संत तुकाराम, संत रोहिदास, महात्मा गांधी यांची हत्या ज्या प्रकारे करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे. विचार मारून टाकण्यासाठी माणसे मारून टाकण्यात आली. दाभोळकर अलीकडेच माझ्या घरी जेवायला आले होते. ते मला म्हणाले होते, ‘तुम्ही फार कडक भूमिका घेता.’ आज त्यांचीच हत्या करण्यात आली. वैचारिक भूमिका घेऊ शकणाऱ्यांचेच हे कृत्य आहे. दाभोलकर यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
त्यांचे कार्य सुरू राहील
– डॉ. जयंत नारळीकर
 समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रयत्न केले. या कार्यासाठी जणू त्यांनी संघबांधणी केली होती. त्यांच्यावर अवेळी मृत्यू ओढवला हे दुर्दैवी आहे. त्यांचे कार्य सुरू राहील आणि त्यासाठी युवक पुढे येतील.
महाराष्ट्राच्या लोकशाहीला धक्का
– डॉ. सदानंद मोरे
डॉ. दाभोलकरांची हत्या ही महाराष्ट्राच्या लोकशाहीला बसलेला धक्का आहे. लोकशाही पद्धतीने चळवळ पुढे कशी न्यावी याचा ते आदर्श होते. त्यांच्या विचारांना विरोध करणाऱ्यांशी चर्चा करण्याची, आपले म्हणणे पटवून देण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. विरोधकांवरही त्यांनी कधी व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. संयमाने आणि तोलून मापून त्यांनी चळवळ चालवली होती. त्यांच्यावर या आधीही हल्ले झाले होते, टीका झाली होती, धमक्या आल्या होत्या. मात्र, तरीही विचारांवर निष्ठा ठेवून तळहातावर शिर घेऊन त्यांनी चळवळ सुरू ठेवली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्यामुळे जे कार्यकर्ते मनापासून काम करणारे आहेत, ते या गोष्टीची भीती बाळगणार नाहीत. पण चळवळींमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा परिणाम होईल.
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेणे हीच डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली
– श्याम मानव
पुरोगामी चळवळच नाही, तर लोकशाहीवर आणि विचारस्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्यांचा हा अपमान आहे. आपल्या संस्कृतीला काळिमा फासणारी आणि लाजिरवाणी अशी ही घटना आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा निषेध करते. विचारांची लढाई विचारांनी लढू न शकणाऱ्या फॅसिस्टांची मजल खून करण्यापर्यंत गेली आहे, ही चिंताजनक बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अधिक जोमाने पुढे नेणे, हीच डॉ. दाभोलकरांनी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्रातील सबुद्ध जनतेने एकत्र येऊन डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा प्रसार करून जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक जोमाने काम करेल.
समाजाची हार
– विलास वाघ
डॉ. दाभोलकरांसारख्या कार्यकर्त्यांचं असं होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण त्यांनी कधीच जहाल, प्रखर, समाज विघातक गोष्टी केल्या नाहीत. सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेली. त्यामध्ये त्यांचा कधीच, काहीच स्वार्थ नव्हता. समाजात समता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या माणसाचा अशाप्रकारे अंत व्हावा, हे दु:खदायक आहे. सामाजिक समतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी निर्माण केली होती. त्यामुळे चळवळींमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले होते. त्यांनी देव, धर्म या संकल्पनांना विरोध केला नव्हता, तर त्या संकल्पनांचा आधार घेऊन चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींना त्यांचा विरोध होता. ज्या गटांना पुरोगामी विचार वाढावा असे वाटत नाही, त्यांनी केलेले हे कृत्य आहे. त्यांच्या हत्येनंतर समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन बंद पुकारला आहे. याचाच अर्थ समाजाला दाभोलकर पटत होते. त्यांची हत्या समाजाची हार आहे.
अग्रगण्य लढवय्या हरपला
– डॉ. विजय पांढरीपांडे
पुरोगामी चळवळीतील अग्रगण्य लढवय्या, बुद्धिवादी कार्यकर्ता, सानेगुरुजींच्या परंपरेतील विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ कोणाही बुद्धिवादी, ज्ञान-विज्ञानवादी विचारवंतांसाठी प्रेरणादायी आहे. विवेकाच्या कसोटीवर खरे ठरणारे विचारधन ‘साधना’च्या माध्यमातून त्यांनी वाचकांपुढे मांडले. त्यांचे विचार, लेखन व भाषणे समाजाला पुढे नेणारे, सज्ञान करणारे असे होते. हा विचारप्रवाह असाच पुढे रेटणे, त्यांच्या चळवळीचे संवर्धन करणे हीच डॉ. दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
विचार व्यक्त करायला लोक घाबरतील
– डॉ. सुहास पळशीकर
डॉ. दाभोलकरांच्या हत्येने झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. विशिष्ट विचारांचा प्रसार करताना तयार झालेल्या वैचारिक प्रतिस्पध्र्यामधून कुणामुळे हत्या झाली याबाबत काही स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या मुद्दय़ावर काही बोलणे योग्य नाही. मात्र, तरीही त्यांच्या हत्येमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपले विचार व्यक्त करायलाही लोकं घाबरतील.
लाखात एक कार्यकर्ता
– डॉ. श्रीराम लागू
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जाण्याने झालेले नुकसान भरून निघणारे नाही. असे कार्यकर्ते लाखात एक असतात, ते मागूनही मिळत नाहीत. कामात झोकून देण्याची त्यांची तयारी असे. प्रामाणिक, कार्यनिष्ठ असे ते व्यक्तिमत्त्व होते. अशी माणसे गेली, तर जगायचे कुणी?

Story img Loader