पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍याला पुणे शहर युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात येत असून त्यांच्याकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागांत लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराच्या कमिटीमध्ये रोहित टिळक होते आणि ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीदेखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जाऊ नये अशी मागणी शहरातील काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रोहित टिळक यांच्याकडे केली होती. तर या पुरस्काराबाबत हायकमांडकडे तक्रार करीत नाराजीदेखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा – दहशतवाद्यांच्या सूत्रधाराचा एटीएसकडून शोध

या सर्व घडामोडीनंतर उद्या १ ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार सोहोळ्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक संघटना एकत्रित आल्या आहेत. उद्या ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाण्याच्या मार्गावर मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. पण त्यापूर्वीच शहर काँग्रेसकडून ‘गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागांत लागले आहे. या फ्लेक्सची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेणार दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.

हेही वाचा – पुणे : लोहियानगर परिसरात अनोळखी तरुणाचा खून

पुण्यात उद्या सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल

उद्या १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात येतील. वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत आणि प्रशासनामार्फत करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go back mr crime minister youth congress opposes pm modi pune visit banners in pune svk 88 ssb
Show comments