डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला दीड महिना उलटला, तरी पुणे शहर गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींना पकडण्यात अपयश आले असून, आता या गुन्ह्य़ाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे दिला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाकडून पावले उचलली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट रोजी डॉ. दाभोलकर यांची दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या गुन्ह्य़ाचा तपास गेल्या दीड महिन्यांपासून पुणे शहर गुन्हे शाखेची २३ पथके तपास करत आहेत. त्यांना दहशतवादविरोधी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि मुंबई पोलीस मदत करत आहेत. डॉ. दाभोलकर यांचे मारेकऱ्यांचे चित्रिकरण सात ठिकाणचे सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना मिळाले आहे. हे चित्रिकरण अधिक स्पष्ट करण्यासाठी लंडनला पाठविले होते. पण, ते स्पष्ट न झाल्यामुळे त्याची आशाही मावळली आहे. हा खून सुपारी देऊन केल्याचे दिसून आल्यामुळे राज्यातील अशा गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. त्याच बरोबर हिंदुत्ववादी संघटना, बोगस डॉक्टर, मांत्रिक, बाबा-बुवा, ज्योतिषी यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांच्याकडे ही चौकशी करण्यात आली.
पुणे पोलीस या प्रकरणी काही धागेदोरे मिळाल्याचे गेल्या पंधरा दिवसांपासून सांगत आहेत. मात्र, हल्लेखोरांपर्यंत पोचण्यास त्यांना अपयश आले. विविध संघटनांकडून या गुन्ह्य़ाचा तपास लवकर लावावा, अशी मागणी होत असल्यामुळे आता राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. दीड महिना उलटला, तरी पुणे पोलिसांना या गुन्ह्य़ाचा तपास लावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता या गुन्ह्य़ाचा तपास सीबीआयकडे दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर काही व्यक्तींनी या गुन्ह्य़ाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर अद्याप निर्णय होणे बाकी आहे.
राज्य सरकारवर वाढता दबाव
नरेंद्र दाभोलकर यांच्या तपास लवकर व्हावा म्हणून राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना, ‘तपासामध्ये प्रगती नसेल, तर हा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात येईल,’ असे सांगितले होते. या तपासात काही धागेदोरे मिळाले असून ३० सप्टेंबपर्यंत या गुन्ह्य़ाचा तपास लावला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी या वेळी दिले होते. पण, ३० सप्टेंबर ही तारीख उलटून गेली तरी तपासात काहीच प्रगती न झाल्याने हा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस आयुक्त पोळ यांनी सांगितले, ‘‘डॉ. दाभोलकर हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या गुन्ह्य़ात तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता नाही. मात्र, हा निर्णय शासनाच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्याबाबत अधिक बोलू शकत नाही. आम्ही योग्य दिशेने तपास करत आहोत.’’