पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) ठेवण्यासाठी जिल्ह्यात अत्याधुनिक असे गोदाम उभारण्यात येणार आहे. रावेत येथील सुमारे सात एकर इतक्या जागेत हे गोदाम उभारले जाणार असून या ठिकाणी ईव्हीएम यंत्रे ठेवण्याबरोबरच सुमारे ११ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी देखील होऊ शकणार आहे.
निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी सध्या भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामाचा वापर केला जातो. ईव्हीएम यंत्रे ठेवण्यासाठी हक्काची जागा आवश्यक असल्याने रावेत येथील जागा देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गोदाम उभारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्ली येथील ईव्हीएम ठेवण्याच्या गोदामाची पाहणी केली. त्यानंतर रावेत येथे ईव्हीएमसाठी गोदाम उभारण्याचा आराखडा तयार केला आहे.
पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदान केंद्रांची संख्या सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक आहे. ईव्हीएम यंत्रांमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट याचसह व्हीव्हीपॅटचा समावेश होतो. त्यामुळे ही मतदान यंत्रे ठेवण्यासाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक होते. पाऊस, वारा आणि आग यांपासून संरक्षण व्हावे, या हेतूने या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. हक्काची जागा मिळाली, तर ईव्हीएम यंत्रे सुरक्षित राहतील त्यादृष्टीने गोदामाची उभारणी केली जाणार आहे. सध्याचे धान्याची गोदाम हे धान्य साठवणुकीकरिता बांधलेले आहे. वखार महामंडळासाठी देखील धान्याची साठवणूक करण्यासाठी गोदाम मिळणे आवश्यक होते. या सर्व पार्श्वभूमीवर मतदान यंत्रासाठी गोदाम उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५१ कोटींचा खर्च अपेक्षित असून पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
मतदान यंत्रे ठेवण्यासाठी रावेत येथील सात एकर जागा
- सुमारे ७५ हजार मतदान यंत्रे ठेवता येणार
- याठिकाणी मतमोजणी प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह
- याठिकाणी ११ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी देखील होऊ शकेल
- वाहनतळाची सुविधा