मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईला वाचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील एक तरुण घरोघरी जाऊन पैसे मागत असून रुग्णालयाचा खर्च उचलण्याचा तो प्रयत्न करतोय. छाया शंकर मद्रेवार असं आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा अमोल हा शहरातील गल्लोगल्ली फिरून पैसे जमा करत आहे. दीड महिने छाया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पैशांअभावी त्यांना घरी आणण्यात आले आहे. लवकर त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी अमोलला सांगितलं आहे.
अमोलची परिस्थिती तशी जमतेम आहे. वडील वाहनचालक असून ते ६२ वर्षांचे आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाहची जबाबदारी अमोलवर आहे. हालाखीची परिस्थिती असताना अचानक छाया यांची तब्बेत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या आजारावर तब्बल १० ते १५ लाख खर्च येणार असल्याची माहिती अमोलने दिली आहे. गल्लोगल्ली फिरून अमोलने आत्तापर्यंत 40 हजार जमा केले आहेत.
अमोल त्याच्या आई वडिलांसोबत राहतो. वाहनचालक असणाऱ्या वडिलांचा देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लागायचा परंतू वय जास्त झाल्याने त्यांच्या नोकरीवर पुढील महिन्यात गदा येणार आहे अशी माहिती अमोल दिली आहे. अमोलचे छोटेशे जनरल स्टोअरचे दुकान आहे. मिळेल त्या पैशांमधून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो आहे. परंतू त्यांच्या सुखी कुटुंबाला दृष्ट लागली आणि तीन महिन्यांपूर्वी अचानक आई छाया यांना दम लागायला लागला. डॉक्टरांनी अगोदर हे गंभीर नसल्याचं सांगितलं. मात्र, त्यानंतर त्यांना जास्त त्रास होऊ लागला. त्यांच्यावर दीड महिना खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. छाया यांचं वजन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर इतर काही शस्त्रक्रिया करायच्या असून त्या लवकर न केल्यास त्यांचे वजन २०० किलोच्या पुढे जाऊ शकतं असं डॉक्टरांनी अमोलला सांगितलं आहे. त्याचा खर्च ही लाखोंच्या घरात आहे.
दीड महिना छाया यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र आता पैशांअभावी त्यांना घरी आणण्यात आलं असून त्यांच्यावर पुन्हा उपचार होणे गरजेचे आहेत. अमोलला एवढा खर्च झेपत नसल्याने त्याने आईला वाचवण्यासाठी घरोघरी जाऊन पैसे जमा करण्यास सुरुवात केलीय. प्रत्येकाच्या घरी जाऊन तो आईविषयी सांगत मदत करण्याचं आवाहन करत आहे. आत्तापर्यंत त्याने ४० हजार जमा केले असून त्याला आणखी लाखो रुपयांची गरज आहे. या मदतीच्या आधारे आपण आईला जीवनदान देऊ असं अमोलचं म्हणणं आहे.