पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याचा आरोपावरून अटकेत असलेले ‘सर्व्हंट्स सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे सचिव मिलिंद देशमुख यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. याप्रकरणी गोखले राज्यशास्त्र संस्थेतील तत्कालीन कुलपती, कुलसचिव, लेखाधिकारी, तसेच देशमुख यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

गोखले राज्यशास्त्र संस्थेतील निधी नियमबाह्य पद्धतीने वळविण्यात आल्याप्रकरणी देशमुख यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. देशमुख यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदारीत्या निधी वळविण्यात आला. याप्रकरणी संस्थेतील तत्कालीन कुलपती, कुलसचिव, लेखाधिकारी आणि देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली.

संस्थात्मक कामासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. देशमुख यांनी केलेल्या खर्चाचा तपशील संशयास्पद आहे. ही रक्कम कोठे वळविली, या दृष्टीने सखोल तपास करायचा आहे. देशमुख यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवस वाढ करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने देशमुख यांच्या पोलीस कोठडीत शुक्रवारपर्यंत (११ एप्रिल) वाढ करण्याचा आदेश दिला.