नवरात्र सुरू होऊनदेखील न बहरलेला सोन्याच्या दागिन्यांचा बाजार गुरुवारी दसऱ्याच्या मुहूर्ताला ग्राहकांच्या गर्दीने फुलला. या वर्षी सोनेखरेदीत जाणवलेली घट पाहता ही बाब सराफ व्यावसायिकांकडून महत्त्वाची मानली जात असून दिवाळीपूर्वी बाजारात पुन्हा चैतन्य दिसून येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोनेखरेदीत लक्षणीय घट जाणवली. या बाजाराला या वर्षी २५ ते ३० टक्क्य़ांनी खप कमी होण्याचा फटका बसल्याचे निरीक्षण काही सराफ व्यावसायिकांनी नोंदवले. नवरात्र सुरू होताच सराफी बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरू होते. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने घरी नेण्यासाठी दागिन्यांची ‘ऑर्डर’ देण्यासही सुरुवात होते. ही वर्दळ यंदा कमी होती. थंड गेलेल्या नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर दसऱ्याला बाजारात जीव यावा अशी आशा व्यावसायिकांकडून व्यक्त होत होती. ही अपेक्षा खरी ठरली आणि गुरुवारचा दसरा सोनेखरेदीसाठी नवीन आशा घेऊन आला.
‘पूना गाडगीळ अँड सन्स’ या सराफी पेढीचे भागीदार अजित गाडगीळ म्हणाले,‘या वर्षी पुण्याच्या सोने बाजारातही खपात २० ते २५ टक्क्य़ांची घट जाणवली. दसरा मात्र चांगला गेला असून सोन्याच्या तयार दागिन्यांना ग्राहकांनी अधिक प्रतिसाद दिला. सोन्याच्या भावामध्ये नजिकच्या काळात फारसा फरक पडलेला नाही, पण हा भाव २२ ते १८ हजारांवर येईल अशा बातम्या येत होत्या, त्यामुळे त्या आशेवर ग्राहक थांबून राहिले होते. परंतु भाव विशेष खाली उतरला नाही म्हटल्यावर दसऱ्याला लोक एकदम खरेदीस बाहेर पडल्याचे दिसून आले. गुरुवारी सोन्याचा भाव २७ हजार रुपये होता. सोन्याच्या भावावर अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टींचा परिणाम होत असला तरी दिवाळीपर्यंत भावात फारसा फरक पडेल असे वाटत नाही. आता नोकरदारांना बोनसदेखील मिळू लागतात, त्यामुळे दिवाळी चांगली जाईल अशी आशा आहे.’
ग्रामीण भागात यंदा सोने बाजारावर दुष्काळ आणि शेतीच्या प्रश्नांचा परिणाम दिसून येत आहे, परंतु पुणे, मुंबई आणि नाशिक अशा शहरी भागांमध्ये दसरा चांगला गेल्याचे निरीक्षणही गाडगीळ यांनी नोंदवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा