भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे पूजा साहित्य असा दहा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना येरवडा भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात घडली. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत.
सदनिका बंद करुन त्या कामानिमित्त सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीचे पूजा साहित्य असा दहा लाख साडेचार हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.