लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन सराफा व्यावसायिकाची ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली.
गणेश शिवाजी भिंगारे (वय ३६, रा. फणसडोंगरी पेण, ता. पेण, जि. रायगड), राकेश भवानजी पासड (वय ४२, रा. अंबरनाथ वेस्ट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विक्रांत गणेश दाभाडे यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडे हे सराफ व्यापारी आहेत. आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी दाभाडे यांना बनावट सोन्याची चेन खरी असल्याचे भासवून दिली. त्याची पावतीही दाखवली. बाजारभावापेक्षा कमी किंमत देण्याची आरोपींनी मागणी केली. आपला फायदा होत असल्याने दाभाडे यांनी ती चेन घेऊन आरोपींना ७० हजार रुपये दिले. त्यानंतर दाभाडे यांनी चेन घासून बघितली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला. लोणावळा येथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.