सोन्याने तीन वर्षांतील नीचांकी दर गाठल्याने पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी सोनेखरेदीसाठी झुंबड उडाली. साडेतेवीस कॅरेट वळय़ाचा दहा ग्रॅमचा दर २५,३०० रुपयांपर्यंत खाली उतरल्याने एरवीच्या तुलनेत दीडपटीपेक्षा जास्त विक्री झाल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. अशी स्थिती काही दिवस कायम राहण्याची शक्यताही वर्तवली आहे.
पुण्यात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण आहे. याशिवाय सध्या लग्नसराई किंवा सणासुदीचे दिवसही नाहीत. तरीसुद्धा सोन्याचे दर मोठय़ा प्रमाणात उतरल्याने पुण्यातील सराफी दुकानांमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. पुण्यात बुधवारी सोन्याच्या दागिन्यांचा दर प्रति दहा ग्रॅम २५,५०० रुपये, तर साडेतेवीस कॅरेट वळय़ाचा दर प्रति दहा ग्रॅम २५,३०० रुपयांच्या आसपास होता. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांकी दर आहे. त्यामुळे ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून सोन्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे शहरात नेहमीच्या तुलनेत दीडपटीपेक्षा जास्त विक्री झाली असावी, असे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. काही दुकानांमध्ये रांगा लागल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
‘गुंतवणूक म्हणून खरेदीकडे कल’
‘‘चीनने सोने विक्रीसाठी काढल्यामुळे सर्वच भागातील सोन्याचे दर मोठय़ा प्रमाणात उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेली खरेदी प्रामुख्याने गुंतवणुकीच्या उद्देशाने आणि पुढे लग्नसराईसाठी उपयोग होईल म्हणून झाली आहे. खरेदीत वळय़ाला मोठी मागणी आहे. पुणे शहरात मंगळवार व बुधवारी नेहमीच्या तुलनेत दीडपटीपेक्षा जास्त विक्री झाली असावी. ही स्थिती पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.’’
– अमित मोडक (कमॉडिटी तज्ज्ञ, पूना गाडगीळ आणि सन्स)

Story img Loader