सणासुदीच्या काळात सोन्याच्या तस्करीत चांगलीच वाढ होते. त्यामुळे आखाती देशातून या काळात तस्करी करून सोने देशात आणले जाते. तस्करी करून आणलेले सोने खरेदी करण्याचा ओढाही वाढला आहे. सोने तस्करीसाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर केला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून आलेल्या विमानातील प्रसाधनगृहात दडवलेले तब्बल नऊ किलो सोने सीमाशुल्क विभागाच्या हाती नुकतेच लागले. आखाती देशात सोन्याची किंमत कमी असल्यामुळे तेथून तस्करी करून सोने आणण्यात येते. तस्करी करून आणलेल्या एक किलो सोन्यामागे जवळपास तीन लाख रुपयांचा नफा मिळतो. मात्र अशा प्रकारे आणलेल्या सोन्यामुळे सरकारचे कोटय़ावधी रुपयांचे आयातशुल्क बुडते.

एके काळी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्याची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होत होती. तस्करी करून आणलेला माल विकण्याचा धंदा १९७०-८० च्या दशकात तेजीत होता. यात गुंड टोळ्यांनी पाळेमुळे रोवली होती. सोन्याविषयी सर्वाधिक आकर्षण भारतात आहे. चीन खालोखाल सोन्याला सर्वाधिक मागणी भारतात आहे. त्यामुळे हजारो टन सोने देशात आयात करावे लागते. सोने आयात करताना त्यासाठी शुल्क भरावे लागते. तस्करी करून आणलेल्या सोन्याला आयात शुल्क भरावे लागत नाही. त्यामुळे सोने तस्करी करून आणले जाते, अशी माहिती सीमाशुल्क विभागातील (कस्टम) एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

अनेक सराफी व्यावसायिकांचे तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांच्याशी संगमनत करून तस्करी करून सोने आणले जाते. तसेच गोल्ड रिफायनरीकडून सोने खरेदी न करता तस्करांकडून सोने खरेदी केले जाते. तस्कर सोने गाळणाऱ्या छोटय़ा व्यावसायिकांकडे सोन्याची बिस्किटे किंवा लगड देतात. हे सोने साच्यात ओतून ते पुन्हा विक्री केली जाते, असेही सांगण्यात आले. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारने आयात शुल्क वाढवले आहे. दहा टक्के आयात शुल्कामुळे सोन्याचे दर वाढले. सणासुदीच्या काळात विशेषत: दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होते, असे निरीक्षण नोंदविले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling