दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकानं पकडलं आहे. संबंधित प्रवाशाने तस्करी करून आणलेले सोन्याचे दागिने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले दागिने २६ लाख ४५ हजार रुपये किमतीचे असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आरोपी प्रवाशानं तस्करी करून आणलेले दागिने घेण्यासाठी विमानतळ परिसरात आलेल्या अन्य एका आरोपीला देखील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित आरोपींविरोधात कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेला एक प्रवासी उतरला होता. तो विमानतळाच्या आवारातून बाहेर पडत असताना कस्टमच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता, त्याच्याकडे सोन्याच्या बांगड्या, साखळी सापडली. अधिकाऱ्यांनी आरोपी प्रवाशाकडून ५०० ग्रॅम सोन्याचं दागिने जप्त केले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत २६ लाख ४५ हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या पुणे कार्यालयातील अधिकारी धनंजय कदम यांनी दिली. दुबईहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता विमानतळाबाहेर एक जण तस्करी करुन आणलेल्या सोन्याचे दागिने घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळ परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling from dubai 2 accused arrested at pune international airport pune print news rmm