पुणे : रविवार पेठेतील सराफी पेढीतून नववर्षाच्या रात्री सव्वापाच किलो सोने आणि पावणे करा लाखांची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून साडेतीन किलो सोने आणि पावणे दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी चोरलेले सोने केळीच्या बागेत, पाण्याच्या पाईपमध्ये, तसेच जनावरांच्या खाद्यात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
सुनील खंडू कोकरे (वय २०), अनिल खंडू कोकरे (वय २३), नवनाथ खंडू कोकरे (वय १९), राजश्री खंडू कोकरे (वय ४५), अनिल पांडुरंग गराळे (वय २३, रा. सर्व. कारंडेवाडी, ता. जत, जि. सांगली) आणि तानाजी राजाराम खांडेकर (वय २२, रा कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सुनील कोकरे सोने घेऊन पसार झाल्यानंतर त्याने सोने आणि रोकड साथीदार अनिल गराळे याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी अनिलला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने माहिती नसल्याची माहिती दिली. आरोपींकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा सुनीलने सोने आणि रोकड केळीच्या बागेत, पाण्याच्या पाईपमध्ये, तसेच जनावरांच्या खाद्यात ठेवले होते. पोलिसांनी धातूशोधक यंत्राच्या सहायाने (मेटल डिक्टेकर) सोने शोधून जप्त केले.
रविवार पेठेत राज कास्टिंग सराफी पेढी आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ सराफी पेढी आहे. सराफी पेढीत दागिने घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील पेढींना केली जाते. पेढीतील व्यवस्थापक आणि कामगार पेढीतील एका खोलीत राहत होते. नववर्षाच्या रात्री आरोपींनी दारु प्यायली. एकाने व्यवस्थापकाकडील चाव्या चोरल्या तिजोरीतून पाच किलो ३२३ ग्रॅम सोने आणि १० लाख ९३ हजारांची रोकड आरोपी कोकरे, गराळे, खांडेकर पसार झाले. सराफी पेढीतून पाच किलो सोने आणि रोकड चोरीला गेल्यानंतर सराफ बाजारात खळबळ उडाली.
पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. सांगली आणि कोल्हापूर परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सुनिल कोकरे मुख्य आरोपी असून, तो सराफ व्यावसायिकाकडे कामाला होता. घटनेच्या दोन दिवस आधी त्याने गावी जायचे आहे, असे सांगून सुट्टी घेतली होती. मात्र, तो गावी गेला नव्हता. चोरी करताना आरोपी कोकरे आणि त्याचा मित्र पेढीत होते. चोरी केल्यानंतर दोघे जण पसार झाले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
हेही वाचा : पुणे पोलिसांकडून रात्रभर गन्हेगारांची झाडाझडती; दीड हजारांपैकी ‘एवढे’ गुन्हेगार सापडले तावडीत
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीसिंग गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, आशिष कवठेकर, प्रमोद मोहिते, गणेश दळवी, निर्मला शिंदे, वैभव स्वामी, तुषार खडके, राहुल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर यांनी ही कामगिरी केली.