‘अरे आवाज कुणाचा’, ‘थ्री चिअर्स फॉर.. हिप हिप हुर्रे..’ अशा घोषणा शनिवारीदेखील पुन्हा घुमणार आहेत. सळसळत्या तरुणाईचा जल्लोष आणि रंगकर्मीचा थरार पुन्हा एकदा अनुभवावयास मिळणार आहे. हे रंगकर्मी नवोदित नाहीत, तर नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणारे आहेत. फक्त स्थळामध्ये बदल करण्यात आला आहे. ‘पुरुषोत्तम’ची उत्कंठा अनुभवणारे नाटय़प्रेमी शनिवारी भरत नाटय़ मंदिर या पारंपरिक स्थळाऐवजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता भेटणार आहेत.
‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष’ असा गौरव लाभलेली पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. हे औचित्य साधून ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेतर्फे शनिवारी (१० मे) ‘पुरुषोत्तम’च्या सर्व आजी-माजी स्पर्धकांच्या स्नेहमेळाव्याने सुवर्णमहोत्सवी वर्षांची सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते विक्रम गोखले, लेखक-अभिनेता अभिराम भडकमकर, न्या. मृदुला भाटकर यांच्यासह यापूर्वीच्या स्पर्धेतील रंगकर्मी आणि तंत्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती, संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली. सुवर्णमहोत्सवी वर्षांत भव्य स्पर्धा, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन, नाटय़प्रयोग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी आर्थिक पाठबळाची नितांत आवश्यकता असून ‘पुरुषोत्तम गौरव निधी’ संकलित केला जाणार असल्याचे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.
सुवर्णमहोत्सवातील ठळक उपक्रम
– दिग्गज कलाकारांच्या मुलाखती, आठवणी आणि गप्पा
– ‘पुरुषोत्तमी’य आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन
– नाटय़संहिता लेखन, अभिनय, दिग्दर्शन याविषयी कार्यशाळा
– सवरेत्कृष्ट एकांकिकांच्या संग्रहाचे प्रकाशन
– संस्थेचा खास नाटय़प्रयोग आणि व्हिडीओ फिल्म
– गाजलेल्या निवडक एकांकिकांचे नव्याने सादरीकरण
– पुरुषोत्तम विजेत्या अभिनेत्यांची महाकलाकार स्पर्धा
‘पुरुषोत्तम करंडक’चा सुवर्णमहोत्सव – येत्या रविवारी कलाकारांचा स्नेहमेळावा
‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष’ असा गौरव लाभलेली पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे.
First published on: 07-05-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden jubilee year of purushottam karandak