पिंपरी : निगडी पोलिसांनी २५० किलोमीटर अंतरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. त्याच्यासह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे. दोघांकडून पोलिसांनी १३ लाख ५७ हजार २०० रुपये किमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

उमेश सुरेश पेहरकर (३१, टाकली सागज, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), बाळासाहेब भागवत उदावंत (वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण, सोमनाथ मधुकर चोबे, अक्षय हिराचंद त्रिभुवन यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकुर्डी येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर निगडी पोलिसांनी चोर आलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु केली. चोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात चोरी केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरातील हडपसर येथे सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या दिवशी दागिने हिसकावले.

निगडी पोलिसांनी हडपसर मार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात तपास सुरु केला. नेवासा पर्यंत पोलिसांना चोरांचा सीसीटीव्हीच्या आधारे पाठलाग केला. त्यानंतर आरोपीची ओळख पटवून वैजापूर येथे तीन दिवस सापळा लावून उमेश पेहरकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून निगडी, हडपसर, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दागिने हिसकावल्याचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिने त्याने वैजापूर येथील एका सराफ व्यावसायिकाला विकले होते.

पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला देखील अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी भगवान नागरगोजे, सिद्राम बाबा, दत्तात्रय शिंदे, शिवाजी नागरगोजे, स्वप्नील पाचपिंडे, विनायक मराठे, दीपक पिसे, सुनील पवार, प्रवीण बांबळे, केशव चेपटे, नूतन कोंडे यांनी केली.