पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. तर गट ब सेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती
● सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
● महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
● वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
● गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
● महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
● गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
● वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
● वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
● मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे
आतापर्यंत दोन हजार पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात एमपीएससीने प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याशिवाय देशाच्या प्रशासकीय इतिहासातही एवढ्या पदांची भरती लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाणे दुर्मीळ आहे. एकाच अर्जाद्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे.