पुणे : पुणे मेट्रोने प्रवाशांना स्थानकात सहजपणे प्रवेश करता यावा यासाठी पाच स्थानकांनी नवीन प्रवेशद्वारे खुली केली आहेत. त्यात पुणे महापालिका, छत्रपती संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना, कल्याणीनगर आणि बोपोडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
पुणे महापालिका मेट्रो स्थानकाचे नवीन प्रवेशद्वार नदीच्या कडेला असल्यामुळे प्रवाशांना तेथून थेट पादचारी पुलावर जाता येईल. त्यांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता आता राहणार नाही. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक या दोन्हींची प्रवेशद्वारे विरुद्ध दिशेला जंगली महाराज रस्त्यावर आहेत. यामुळे रस्ता न ओलांडता या प्रवेशद्वारातून प्रवासी थेट स्थानकात जाऊ शकतात.
बोपोडी मेट्रो स्थानक आणि कल्याणीनगर मेट्रो स्थानक यांच्या नवीन प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांना रस्ता न ओलांडता स्थानकाच्या पादचारी मार्गावर जाता येईल. यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे आणि सहजपणे मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. नवीन प्रवेशद्वारांमुळे मेट्रो स्थानकांच्या सध्या सुरू असलेल्या प्रवेशद्वारांवरील प्रवासी गर्दीचा ताणही कमी होणार आहे. याचबरोबर स्थानकापर्यंत पोहोचण्याचा प्रवाशांचा वेळही काही प्रमाणात कमी होणार आहे.
प्रवाशांना जागतिक दर्जाची मेट्रो सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्थानकांची सुरू करण्यात आलेली नवीन प्रवेशद्वारेही याचाच भाग आहेत. यामुळे प्रवाशांना अतिशय सहजपणे आणि कमी कालावधीत मेट्रो स्थानकात पोहोचण्यास मदत होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.