पुणे : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन उद्या (ता. ६ ) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला सकाळी १० वाजता हिरवा झेंडा दाखवतील. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन ६ मार्चला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. रुबी हॉल स्थानकातून एक आणि रामवाडी स्थानकातून एक अशा दोन गाड्या उद्घाटनावेळी सोडण्यात येतील. याबरोबर पिंपरी-चिंचवड स्थानकात निगडीपर्यंतच्या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदींच्या हस्ते होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले. या वेळी महामेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ आणि कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे उपस्थित होते.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. या मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच हे स्थानक सुरू केले जाईल, असेही हर्डीकर यांनी सांगितले.
जिल्हा न्यायालय ते रुबी हॉल दरम्यान ब्लॉक
रुबी हॉल ते रामवाडी हा विस्तारित मार्ग सुरू असल्याने जिल्हा न्यायालय ते रुबी हॉल दरम्यानची मेट्रो सेवा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीत मेट्रोच्या तिकिटासह सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या जातील. त्यानंतर दुपारी १२ पासून रामवाडीपर्यंत मेट्रोची सेवा प्रवाशांसाठी खुली होईल.
हेही वाचा – पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा
मेट्रोची विस्तारित सेवा
वनाझ ते रामवाडी – १६ किलोमीटर
पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय – १३ किलोमीटर