पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील आनंदऋषीजी चौकातील प्रस्तावित ‘समतल विभाजकाच्या’ (ग्रेड सेप्रेटर) कामाच्या पूर्वगणक पत्राला शुक्रवारी अंदाज समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सेनापती बापट रस्त्याने येणाऱ्या वाहनांना या समतल विभाजकाचा वापर करता येणार आहे. शिवाजीनगर येथून हवामान विभागाच्या बाजूने औंधकडे जाणाऱ्या समतल विभाजकाची लांबी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खर्चामध्ये ३० कोटींची बचत होणार आहे.

महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीची बैठक शुक्रवारी झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून कामे सुरू करण्यात आली आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम केले जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे पाषाण आणि बाणेर दिशेने जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठाजवळील आनंदऋषीजी चौकात समतल विभाजक उभारण्याचे नियोजन आहे. दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने समतल विभाजकाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे.

चौकात उभारण्यात येणाऱ्या समतल विभाजकाच्या प्रस्तावावर शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अंदाज समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यापूर्वीच्या प्रस्तावानुसार समतल विभाजक हा शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) येथून सुरू होणार होता. त्यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक जोडण्याचा प्रस्ताव नव्हता. मात्र, आता यात बदल करून सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीलादेखील समतल विभाजकाचा वापर करता यावा, यासाठी लांबी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समतल विभाजकाचे काम नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रास होणार नाही. हे काम वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच हे काम पूर्ण करून समतल विभाजक नागरिकांना खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

असा आहे प्रस्तावित समतल विभाजक

– मार्ग : हवामान खात्याच्या बाजूने ते औंध दिशेला

– लांबी : २१० मीटर

– रुंदी : ८ मीटर (२ लेन)

– कामाचा अवधी : २ वर्षे – अंदाजे खर्च : ७० कोटी रुपये