पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाचा (पीडब्ल्यूडी) कणा समजल्या जाणाऱ्या कनिष्ठ आणि स्थापत्य अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विविध संवर्गांची मिळून दोन हजारांपेक्षा जास्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली.
हेही वाचा – ‘पीएमआरडीए’ वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पात दिरंगाई, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात कबुली
हेही वाचा – निवडणूक कामासाठी २४ तासांत हजर व्हा अन्यथा गुन्हे दाखल करू, विभागीय आयुक्तांचा इशारा
पीडब्ल्यूडीमधील रिक्त पदांबाबत पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि इतर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुणे विभागामध्ये पीडब्ल्यूडी सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशी अंदाजे ३१३ पदे रिक्त आहेत. पीडब्ल्यूडी पुणे विभागाअंतर्गत सद्य:स्थितीत कार्यरत सहायक अभियंता श्रेणी दोन, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्याकडून कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. सहायक अभियंता श्रेणी दोन (स्थापत्य) संवर्गाची ३०१ पदे सरळसेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता संवर्गातील ५३२ पदे भरणे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील १३७८ पदे भरण्याची कार्यवाही निवड समितीकडून सुरू आहे.