पुणे: रेल्वेने हजरत निजामुद्दीन-पुणे एक्स्प्रेस ही गाडी आता मिरज स्थानकापर्यंत केली आहे. आता या गाडीला आणखी चार थांबे देण्यात आले असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय होणार आहे.
निजामुद्दीन-मिरज एक्स्प्रेसला जेजुरी, सातारा, कराड आणि सांगली हे चार अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. निजामुद्दीनहून मिरजकडे जाताना ही गाडी जेजुरी स्थानकावर रात्री ७. ४८ वाजता, साताऱ्यात रात्री ९.४२ वाजता, कराडमध्ये रात्री १०.३७ आणि सांगलीत रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी थांबेल. मिरजहून निजामुद्दीनला जाताना ही गाडी सांगली स्थानकावर पहाटे ५.०२ वाजता, कराडमध्ये सकाळी ६.०२, साताऱ्यात सकाळी ७.०७ आणि जेजुरीत सकाळी ८.४३ वाजता थांबेल. या सातारा, कराड, सांगली या तिन्ही स्थानकांवर गाडीला प्रत्येकी तीन मिनिटांचा थांबा असून, जेजुरी स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा आहे.
आणखी वाचा-वंदे भारत एक्सप्रेस लवकरच येणार नवीन रूपात! असे असतील गाडीतील आधुनिक बदल…
नवीन बदल उद्यापासून (ता.१८) लागू होणार आहेत. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित स्थानकांना देण्यात आले आहेत. याचबरोबर पुणे विभागाला या संदर्भात आरक्षण यंत्रणेत सुधारणा करण्यासही सांगण्यात आले आहे. याचबरोबर सर्व स्थानकांवर याबाबतची सूचना प्रवाशांना देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.