पुणे : म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ४८७७ सदनिकांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (३० मे) रात्री समाप्त होत होती. शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने विविध कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी म्हाडाने या सोडतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना ६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सध्या देण्यात आलेली मुदतवाढ ही अंतिम मुदतवाढ असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले. म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास ७ मार्चपासून सुरुवात झाली. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर २४१६ सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील १८, म्हाडा पीएमएवाय योजनेत ५९ सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत ९७८ सदनिका, २० टक्के योजनेतील पुणे शहरात ७४५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५६१ सदनिका आहेत.
हेही वाचा – ‘पीएसआय’चा निकाल ‘एमपीएससी’कडून जाहीर, पुणे जिल्ह्यातील उमेदवार राज्यात प्रथम!
हेही वाचा – देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी
या पूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ एप्रिल होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन ३० मेपर्यंत अर्ज करण्यास संधी देण्यात आली. आता म्हाडाने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली. सध्या देण्यात येणारी मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच सोडतीचे सुधारीत वेळापत्रक हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जास्तीत जास्त अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास केलेल्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी केले.