पुणे : भरगच्च बसमधून प्रवास, उन्हाचा लागणारा चटका, रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, पोलिसांच्या सूचनांनुसार पावले चालत असताना विजयस्तंभ परिसराजवळ येताच तरुणांच्या अंगात अचानक संचारणारा उत्साह, हातातील झेंडे आणि मोबाइल उंचावून ‘जय भीम’चा जयघोष, अशा उत्साही वातावरणात आणि प्रशासनाच्या उत्तम नियोजनाला अनुयायांकडून शिस्तीचे पालन करत दिलेल्या प्रतिसादामुळे विजयस्तंभ अभिवादन सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरेगाव भीमा येथील २०७ व्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी देश, तसेच राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळपासूनच विजयस्तंभ परिसरात गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी (१ जानेवारी) पहाटेच्या सुमारास भंत्यांकडून मंत्रोच्चाराचा जागर करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंत्री, नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि भीम अनुयायांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी रात्री सात वाजेपर्य़ंत रस्त्यांवर गर्दी दिसून आली.

हे ही वाचा… हिंजवडी आयटी पार्क ते चाकण एमआयडीसी : नव्या वर्षात सुटो उद्योगांचे ग्रहण !

या सोहळ्यासाठी गेल्या वर्षापेक्षा अधिक भीम अनुयायी येणार असल्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाकडून गेल्या महिनाभरापासून तयारी करण्यात आली होती. उपाययोजना आणि सुविधांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. सुविधांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या समित्या स्थापन करून समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, वाहतूककोंडी आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) मोफत बससेवा पुरविण्यात आली होती. भरगच्च बस लोणीकंद येथील वाहनतळापर्यंतच जात असल्याने अनुयायांना विजयस्तंभापर्यंतचे अंतर पायी पार करावे लागले. दोन्ही बाजूंनी रस्ते अनुयायांच्या गर्दीने भरून गेले होते. जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यांच्या कडेला उभे करण्यात आलेले पाण्याचे टँकर, पोलीस मदत कक्ष, आरोग्य केंद्र, ज्येष्ठांसाठी निवारा कक्ष, वाहनतळ याचा पुरेपूर लाभ घेतानाचे चित्र होते. विशेषत: अनेक सामाजिक संघटनांकडून आणि भीमसैनिकांकडून पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, जेवण, ब्लँकेट आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.

पीएमपी रस्त्यातच अडकल्या

या अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याने प्रशासनाकडून पीएमपीच्या मोफत बसचे नियोजन केले होते. लोणीकंदपासून पेरणे फाट्यापर्यंत बसचे नियोजन केले असताना, दुपारनंतर रस्त्यांवर लोटलेला जनसागर आणि इतर सुविधांसाठी उभारण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या केंद्रांमुळे लोणीकंदपासून पेरणे फाट्यापर्यंत बसच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अर्ध्या प्रवासातूनच अनुयायांना बसमधून उतरून पायी प्रवास करावा लागला.

हे ही वाचा… वाढत्या किमती अन् निवडणुकांमुळे घरांच्या बाजारपेठेला घरघर

वाहतूक नियोजन उत्तम

पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींव्यतिरिक्त कुठल्याच वाहनांना विजयस्तंभापर्यंत प्रवेश दिला गेला नाही. दोन ते तीन टप्प्यांत रस्त्यांवर लोखंडी कठडे उभे करून वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. थेट वाहनतळांमध्ये वाहने रवाना करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या चार ते पाच किलोमीटरच्या परिसरातून अनुयायांना सहज चालता येणे शक्य झाले.

खरेदीसाठी गर्दी

विजयस्तंभाच्या मागील मोकळ्या बाजूस मोठ्या प्रमाणात खाद्यापदार्थांची दुकाने, पुस्तके, खेळणी, कपडे विक्रीचे छोटे-मोठे व्यावसायिक बसल्याने विजयस्तंभाला अभिवादन करून बाहेर पडताच अनुयायांची पावले आपसूकच वस्तू खरेदी करण्यासाठी पडत होती. या केंद्रांवरदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोहळ्याला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.

अशी होती पोलिसांची नजर

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही आणि ५०० ‘वायरलेस’ यंत्रणा, ६ दृक्-श्राव्य कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. लाखोंच्या जनसमुदायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करताना दिसून आले. तसेच, पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सोहळ्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, सलग ३० तास बंदोबस्त तैनात होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good planning of administration at koregaon bhima battle anniversary pune print news vvp 08 asj