महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाकडून नुकतीच घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील सदनिकांसाठी अनामत रकमेत वाढ करूनही यंदा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ११०६ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
मध्यस्थांना रोखण्याबरोबरच गरजूंना त्याचा लाभ मिळावा यासाठी परवडणाऱ्या घरांसाठी अर्जासोबत करायच्या अनामत रकमेत म्हाडाकडून वाढ करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफ) या वर्गवारीतील अनामत रक्कम ५० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्य वर्गवारीतील रकमेत पाच हजार रुपयांवरून दहा आणि पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या सोडतीला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेला नागरिकांचा आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा – पुणे : शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती, ३७ जणांना अटक; २७ कोयत्यांसह शस्त्रसाठा जप्त
हेही वाचा – सीईटी, बारावीच्या गुणांना समान महत्त्वाबाबत संभ्रम, शासन स्तरावर हालचाल नाही
याबाबत बोलताना म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘अनामत रकमेत वाढ केल्यानंतरही नागरिकांचा म्हाडाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या ३०१० सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कमी उत्पन्न गट (एलआयजी), आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), मध्यम उत्पन्न गट (एमआयजी), उच्च उत्पन्न गट (एचआयजी) अशा सर्व घटकांसाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली आहे. तरीदेखील आतापर्यंत ११०६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. पिंपरी-वाघिरे येथील ५० हजार, ७५ हजार आणि एक लाख रुपये अशी अनामत रक्कम असूनही अनुक्रमे १३२, ६१ आणि ६० नागरिकांनी अर्ज केले आहेत.’
दरम्यान, पुण्यातील धानोरी, मुंढवा, लोहगाव, तर पिंपरी-चिंचवडमधील मामुर्डी, चऱ्होली, उरवडे, पिंपरी-वाघिरे आणि ताथवडे आणि ग्रामीण भागातील चाकण-महाळुंगे-इंगळे, अंबोडी-रास्ता-सासवड, दिवे-पुरंदर या ठिकाणी म्हाडाच्या सदनिका उपलब्ध आहेत, असेही माने-पाटील यांनी सांगितले.