आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे सासवडकर आता नव्या वर्षी साहित्य पंढरीच्या वारक ऱ्यांचेही स्वागत करणार आहेत. आगामी साहित्य संमेलनामध्ये संयोजन समितीतर्फे ‘साहित्यिक आपल्या घरी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून आतापर्यंत शंभर कुटुंबांनी साहित्यिकांच्या निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस घेतला आहे.
क ऱ्हा नदीकाठी आचार्य अत्रे यांची जन्मभूमी असलेल्या सासवडमध्ये तीन ते पाच जानेवारी या कालावधीमध्ये ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. खर्चाचा बडेजाव न करता देखील हे संमेलन उत्तम पद्धतीने यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने कंबर कसली आहे. संमेलनामध्ये निवास व्यवस्थेत कमतरता पडू नये या उद्देशातून ‘साहित्यिक आपल्या घरी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. स्वागत समितीचे सदस्य करून घेण्याबरोबरच निवास व्यवस्थेच्या माध्यमातून साहित्यिकांची सेवा अशा दुहेरी पद्धतीने सासवडकरांना या संमेलनामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक रावसाहेब पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारक ऱ्यांची सेवा करण्याची प्रथा नित्यनेमाने सुरू आहे. त्यामुळे आता साहित्य पंढरीच्या वारक ऱ्यांचे स्वागत करण्यास सासवडकर उत्सुक आहेत. ज्यांना आपल्या घरी साहित्यिकांनी राहावे असे वाटते, त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. कोणाकडे घरामध्ये एखादी खोली रिकामी आहे आणि दोन साहित्यिकांची निवासाची सोय होऊ शकते अशा व्यक्तींची सूची करण्यात आली आहे. या निमित्ताने साहित्यिकाचा त्या कुटुंबाशी परिचय होतो आणि साहित्यिकांनाही घरच्या वातावरणामध्ये निवासाची सुविधा उपलब्ध होते हा यामागचा उद्देश आहे. अर्थात निवासव्यवस्था लॉजवर हवी की कोणाच्या घरी हे आम्ही साहित्यिकांवरच सोपविणार आहोत.
संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था जेजुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या १५० लॉजमध्ये करण्यात येणार आहे. एकमुखी दत्ताचे मंदिर असलेल्या नारायणपूर येथील भक्त निवासामध्ये १५० जणांच्या निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नारायणमहाराज यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे कोंढवा येथील ट्रिनिटी इन्स्टिटय़ूट येथील वसतिगृहाच्या दोनशे खोल्यांमध्ये प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही रावसाहेब पवार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा