पुणे : अश्लील चित्रीकरणे दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या शाळेत आयोजित ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीने या विषयी वाच्यता केल्यानंतर याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३५ वर्षीय नराधम बापाला अटक केली. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (फ) (आय) (एम), ६५, लैंगिक  अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५ (एल) (एम) (एन) ६, ८, १०, १२ प्रमाणे पीडित मुलीच्या पित्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. तिला आणखी चार बहिणी आहेत. तर, आई खासगी काम करते. फिर्यादी या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या ३० सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे  शाळेमध्ये कार्यालयीन कामकाज करीत होत्या. त्यावेळी शाळेच्या समाजसेविकेने त्यांच्याकडे येऊन एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर, मुख्याध्यापिकेने या समाजसेविकेसह पीडित मुलीला समुपदेशन कक्षात नेले. तेथे विश्वासात घेऊन तिची आपुलकीने विचारपूस करण्यात आली. त्यावेळी पीडित मुलीने तिचे वडील एक वर्षापासून जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत असल्याची माहिती दिली. वडील हे कृत्य करीत असताना असह्य वेदना होतात. तसेच, हातपाय बांधून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा : Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय

आई कामावर गेल्यानंतर पिडीत मुलीच्या चार बहिणींना वडील आजीकडे जायला सांगतात किंवा त्यांना खाऊसाठी पैसे देऊन बाहेर पाठवतात. त्यानंतर वडील आईच्या मोबाईलमधील घाणेरडे चित्रीकरण पाहून तोंडात कापडाचा बोळा कोंबून तशी घाणेरडी कृती करतात. रात्री घरामध्ये सर्वजण झोपलेले असताना पीडित मुलीला झोपेतून उठवून इमारतीच्या टेरेसवर नेऊन बलात्कार करीत असल्याचे मुलीने मुख्याध्यापिकेला सांगितले. ही मुलगी पाचवीमध्ये असताना तिची आई गावी गेली होती. त्यावेळी देखील त्यांनी बलात्कार केल्याचे तसेच वारंवार मारहाण केल्याचे या मुलीने सांगितले.

दरम्यान, या प्रकाराच्या चौकशीसाठी वडिलांना आणि आईला शाळेत बोलावून घेण्यात आले. तिच्या आईचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये अश्लील चित्रीकरण असल्याचे समोर आले. त्यानंतर, आई-वडिलांना मुलींना का मारता अशी विचारणा केली.  तेव्हा मुलगी ऐकत नाही. ती रात्रभर मोबाईल पाहत असते.  तिला धाक बसावा याकरिता तसेच आमचे ऐकण्यासाठी मारल्याचे पालकांनी सांगितले. त्यावेळी मुख्याध्यापिकेने लहान मुलांना मारहाण करु नका अशी समज देत मुलीकडे असलेला मोबाईल चौकशीसाठी ठेवून घेतला.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या लोणावळ्यात

त्यानंतर १५ मिनिटांनी पुन्हा मुलीचे वडील शाळेमध्ये आले. छोट्या सुटीमध्ये मुलीच्या वर्गाबाहेर बोलावून घेत आपल्या दोघांमध्ये घरी घडत असलेला प्रकार कोणाला सांगू नकोस. नाहीतर घरी आल्यानंतर तुला पुन्हा मारीन अशी धमकी दिली. त्यावेळी पीडित मुलीने समाजसेविकेला याविषयी जाऊन सांगितले. शाळेच्या वतीने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून माहिती देण्यात आली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल करीत नराधम वडिलांना गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.