उद्याच्या शुक्रवारी असलेल्या बालदिनी (१४ नोव्हेंबर) संपूर्ण देशभरात गुगलवर पुण्याच्या वैदेही रेड्डी हिने निर्माण केलेले डुडल झळकणार आहे. देशभर घेण्यात येणाऱ्या ‘डुडल फॉर गुगल’ या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
गुगल इंडियातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डुडल फॉर गुगल स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेसाठी देशभरातून १० लाख स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात वैदेहीच्या डुडलला राष्ट्रीय विजेतेपद मिळाले आहे. वैदेही आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत आहे. या वर्षी ‘मला भेट द्यावासा वाटणारा भारतातील प्रदेश’ ही संकल्पना देण्यात आली होती. वैदेहीने ‘नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्वर्ग – आसाम’ अशी संकल्पना घेऊन डुडल तयार केले आहे. त्यात आसामची ओळख असलेला एकशिंगी गेंडा, आसामी नृत्य आणि बांबू या चित्रांचा समावेश आहे. वैदेही तिसरीत असल्यापासूनच चित्र काढते. गुगलच्या या स्पर्धेमुळे देशभरात पोहोचण्याची संधी मिळाल्याचे वैदेहीने सांगितले. ती म्हणाली, ‘मी सुट्टीच्या काळात आसामला गेले होते. मला तो भाग खूप आवडला होता. त्यामुळे या स्पर्धेसाठी आसामवरच डुडल तयार करण्याचे मी ठरवले.’ वैदेहीने तयार केलेले डुडल बालदिनाच्या दिवशी (१४ नोव्हेंबर) गुगल इंडियाच्या होमपेजवर दिसणार आहे.
गुगल डुडल या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. पहिली ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. अंतिम फेरीत देशभरातून बारा विजेत्यांची निवड करण्यात येते. त्यामधून मतदानाच्या आधारे अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक गटातील विजेत्याबरोबरच एका राष्ट्रीय विजेत्याची निवड करण्यात येते. या वर्षी पहिली ते तिसरीच्या गटात मुंबईच्या डीएव्ही पब्लिक स्कूलच्या सर्वज्ञ मिर्याल या विद्यार्थ्यांला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘देवभूमी – केरळ’ या संकल्पनेवर त्याने डुडल रेखाटले आहे. चौथी ते सहावीच्या गटात विशाखापट्टणम येथील श्रीप्रकाश विद्यानिकेतन येथील साईलता राणी या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला आहे, तर सातवी ते दहावीच्या गटातही विशाखापट्टणम येथील श्रीप्रकाश विद्यानिकेतनमधील साई ग्रीष्मा या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
पुण्याच्या वैदैहीने रेखाटलेले डुडल उद्याच्या बालदिनी गुगलवर झळकणार
देशभर घेण्यात येणाऱ्या ‘डुडल फॉर गुगल’ या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
First published on: 13-11-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle childrens day vaidehi reddy