पुणे : देशभरात ‘द केरला स्टोरी’ हा हिंदी चित्रपटाला चांगलाच चर्चेत आहे आणि त्यावर राजकारणही जोरात सुरु आहे. असं असतांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव जिहाद प्रकरण घडल्याचा दावा आज पत्रकार परिषद घेत केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना समोर आणत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

“मंचर येथील पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपी तरुणाला समज देखील देण्यात आली होती.मात्र त्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीस फुस लावून पळवून उत्तरप्रदेशला घेऊन गेला. त्या घटनेला जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला.त्याकाळात पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी वेळोवेळी पोलिसांकडे दाद मागितली पण योग्य प्रकारे तपास झाला नाही” अशी माहिती पडळकर यांनी दिली.

या चार वर्षाच्या काळात मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले, बीफ खाऊ घातले,तिच्यावर अत्याचार करण्यात आले,तिला नमाज करण्यास सांगितले. गेले सहा महिने आरोपी हा मंचर इथल्या घरी पीडित मुलीला घेऊन राहू लागला. द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट पीडित मुलीच्या घरच्या मंडळींनी पाहिला. तो पाहून आपल्या मुलीचं काय झालं असेल ही चिंता पुन्हा वाटू लागली आणि पुन्हा एकदा कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, तेव्हा आरोपी हा मुलीसह गावात आल्याची माहिती मिळाली.

आता आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला शिक्षा झाली पाहिजे, लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. “राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही असं म्हणणारे पीडित तरुणीला आणि कुटुंबीयांची भेटून त्यांची भावना जाणून घेणार का असा प्रश्न विचारत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.ज्या पक्षाच्या नेत्याने राज्याचे गृहमंत्री पद भूषवले त्यांच्याच तालुक्यातील तरुणीसोबत प्रकार घडला आहे. किमान त्यांनी तरी भूमिका मांडावी” अशा शब्दात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव ने घेता पडळकर यांनी टोला लगावला.

Story img Loader