मराठवाडय़ातून उदयास आलेल्या व राज्याच्या राजकारणात स्वत:ची ताकद निर्माण केलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी, भाजप हा पक्ष तळागाळात, सर्व जाती-धर्मामध्ये नेला. त्यांनी पक्षवाढीसाठी खस्ता खाल्या, कष्ट घेतले म्हणून भाजप आज सत्तेत येऊ शकला. मुंडे नसते तर भाजप सत्तेपर्यंत आलाच नसता, असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा जनविकास संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मराठवाडा रत्न पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर शकुंतला धराडे, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, बालाजी पवार आदी उपस्थित होते. या वेळी शारदा मुंढे, दिलीप कोंडेराव, राजेश नेळगे, बबन चव्हाण, शशिकला कांबळे, सईद चाऊस, भागवत जाधव, संतोष भोगाडे, हलिमाबी कुरेशी, समाधान शेंडगे, अश्विनी मोहिते, प्रतीक्षा इंगोले यांना कांबळेंच्या हस्ते गौरवण्यात आले.
कांबळे म्हणाले, मराठवाडा शब्दाबरोबरच मुंडे यांचे स्मरण होते. राज्यात भाजपला मुंडे यांचे नेतृत्व लाभले, त्यांनी सर्व जाती-जमाती व सर्व स्तरात पक्ष नेला. त्यांचे नेतृत्व लाभले नसते तर मीही मंत्री नसतो. माझ्यासारखा झोपडीत राहणारा कार्यकर्ता दोन वेळा मंत्री होऊ शकला, तो त्यांच्यामुळे. मराठवाडय़ामुळे महाराष्ट्राला अनेकांचे नेतृत्व लाभले आहे. पिंपरी पालिकेच्या निवडणुका लक्ष्मण जगतापांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असून पक्ष संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठिशी आहे. भाजपचा महापौर होईल, याची खात्री आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण पवार यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.
चिंचवडसाठी दोन कोटींचा निधी
सामाजिक न्याय विभागाकडून चिंचवड मतदारसंघासाठी दोन कोटींचा निधी देण्याची घोषणा दिलीप कांबळे यांनी केली. तेव्हा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगतापांनी इतर मतदारसंघातही तो निधी देण्याची विनंती केली असता कांबळे यांनी पिंपरी व भोसरीसाठीही निधी देण्याची तयारी दर्शवली.

Story img Loader