पिंपरी : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्यामुळे गोशाळा असणे गरजेचे झाले आहे. शहरात ७०० मोकाट जनावरे असून यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील सुमारे पाच एकर जागेत गो-संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल आदी गोवंशाची संख्या सुमारे ७०० च्या आसपास आहे. गोवंश शहरातील रस्त्यांवर पहायला मिळतात. जखमी झाल्यामुळे किंवा आजारी असल्यामुळे संबंधित गोवंशाला उपचाराची आवश्यकता असते. अनेकदा उपचाराअभावी मृत्यूचे प्रकार घडतात.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत उभारणार ८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय
मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसून असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लहान-मोठे अपघाताच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून गोशाळा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गोशाळा आणि गो संर्वधन व उपचार केंद्र सुरू केल्यास गोवंश वृद्धीच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे. त्यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका घेत चिखलीत गो-शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – पुणे : धक्कादायक..! वाघोलीत प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
रस्ता नसल्याने गो-शाळा रखडली
चिखली, पाटीलनगर येथील इंद्रायणी नदीच्या शेजारी महापालिकेची पाच एकर जागा आहे. या जागेकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गो शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. जागेसाठी पशुवैद्यकीय विभागाने नगररचना विभागाला पत्र देऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आता या प्रश्नी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांबरोबर बैठक घेतल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.