आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी रोहन पाटे यांनी पुण्यात २०१२ साली ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ नावाचं आगळं-वेगळं संग्रहालय उभारलं. ९०च्या दशकापासून ते आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वातील तब्बल ७५ हजारांहून अधित वस्तू या संग्रहालयात आहेत. सचिन तेंडुलकर यांची बॅट, ब्रेट लीची जर्सी, कपिल देव, धोनी अशा सर्वांच्या अविस्मरणीय वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात जपला गेला आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत क्रिकेटच्या वस्तूंचा खजिना जपणारं हे जगातील एकमेव असं संग्रहालय आहे.
सचिन तेंडुलकर यांची बॅट मिळवण्यापासून हा प्रवास सुरू झाला. पुढे प्रत्येक खेळाडूला भेटून त्यांच्याकडून या वस्तू मिळवणं हे रोहन यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. मात्र त्यांनी उभारलेल्या संग्रहालयाची संकल्पना पाहता अनेकांनी स्वतः त्यांना आपल्याजवळील वस्तूही दिल्या. आज बघता बघता रोहन पाटे यांनी आपल्या संग्रहालयात ७५ हजारांपेक्षा जास्त वस्तूंचं दस्तऐवजीकरण केलं आहे. त्यांच्या या भन्नाट ब्लेड्स ऑफ ग्लोरीची गोष्ट एकदा पाहाच. ‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.