डॉ. अभिजीत सोनवणे भीक मागणाऱ्या आजी, आजोबा आणि त्यांच्या मुला, मुलींचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सात वर्षापासून डॉ. सोनवणे हे भिक्षेकऱ्यांपर्यंत मोफत औषधोपचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. या सामाजिक कार्यात अभिजीत यांच्या पत्नी डॉ. मनीषा सोनवणे देखील त्यांना साथ देत आहेत.
स्वतः बरोबर घडलेल्या एका घटनेनंतर अभिजीत यांनी आपली आंतरराष्ट्रीय कंपनीतील प्रमुख पदावरील नोकरी सोडून अशा दुर्लक्षित आणि दुर्बलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. दररोज सकाळी अभिजीत हे मंदिर, मशीद, चर्चबाहेर जातात. तेथे असलेल्या बेघर ज्येष्ठ नागरिकांशी संवाद शाधतात, त्यांची तपासणी करतात. ज्यावेळी रस्त्यावर वैद्यकीय सेवा देता येत नाही, तेव्हा अभिजीत त्यांना सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात हलवतात. केवळ औषधोपचारच नव्हे, तर या बेघर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं कामही सोनवणे करत आहेत. प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं या उद्देशाने त्यांचं हे सामाजिक कार्य सुरू आहे. त्यांचा हा रंजक प्रवास मुलाखतीतून जाणून घेऊ या.