राज्यात सत्ताबदल झाल्यावर विविध नेत्यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी महिन्याभरापूर्वी चंद्रकांत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट घेतली होती.त्यानंतर टिळक यांनी आज भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर का ? अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी भाजपचा बालकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातून दोन वेळा निवडणूक लढवली. त्या दोन्ही निवडणुकीत रोहित टिळक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या कसबा मतदार संघातून टिळक कुटुंबामधील मुक्ता टिळक या आमदार आहेत. मात्र त्या मागील काही महिन्यापासून आजारी आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे.
नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज पशू संवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर विखे पाटील यांची पत्रकार परिषद होताच,रोहित टिळक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी काही वेळ चर्चा देखील केली. या भेटीमुळे रोहित टिळक भाजपात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
हेही वाचा… पाषाण-सूस उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहतूक कोंडी टळण्याची शक्यता
या भेटीबाबत रोहित टिळक यांच्या सोबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, अनेक वर्षापासुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी परिचय आहे, अनेकदा संवाद होत असतो. त्यामुळे आजच्या भेटीमुळे कोणत्याही प्रकाराचा राजकीय अर्थ काढू नये, मी त्यांना वैयक्तिक कामासंदर्भात भेटलो असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.