पुणे : इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज अतिशय कमी असतो. त्यामुळे अनेक वेळा वाहन जवळ आले तरी त्याचा फारसा आवाज होत नाही आणि अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ई-वाहनांचा आवाज वाढविण्यात येणार आहे. याला केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी गुरुवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज इतर वाहनांसारखा होत नाही. त्यामुळे मागील काही काळात पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. ई-वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲकॉस्टिक व्हॉईस अलर्ट सिस्टीम (एव्हीएएस) बसवण्याची शिफारस करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत नियमावली तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे, असे डॉ. मथाई यांनी सांगितले.

मालमोटारी व बससारख्या अवजड वाहनांच्या चार्जिंगसंदर्भात बोलताना डॉ. मथाई म्हणाले की, आतापर्यंत अवजड वाहनांचे चार्जिंग करण्यासाही १०० किलोवॉटचा एसी/ डीसी चार्जर वापरला जात होता. आता एआरएआयने १०० किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेचा चार्जर विकसित करण्यावर भर दिला आहे. याचबरोबर अवजड वाहनांसाठी ओव्हरहेड चार्जिंग सिस्टीम विकसित करण्याचे कामही सुरू आहे. अवजड वाहनांच्या डोक्यावर याचा चार्जिंग पॉईंट असेल त्यामुळे सुरळीतपणे विनाअडथळा अवजड वाहनांचे चार्जिंग वेगाने होणे शक्य होईल.

ताकवेमध्ये विशेष चाचणी ट्रॅक

एआरएआयने तळेगाव दाभाडेजवळील ताकवे येथे सुमारे १४६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्सच्या (एडीएएस) वाहनांची चाचणी करण्यासाठी २० एकर जागेमध्ये एक विशेष ट्रॅक तयार केला आहे. भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तिथे सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तशी परिस्थिती निर्माण करून चाचण्या केल्या जातील, असे डॉ. मथाई यांनी नमूद केले.

हेही वाचा : इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल-डिझेलवरील वाहनांपेक्षा महाग का? किमती कधी कमी होणार?

ॲकॉस्टिक्स व्हॉईस अलर्ट सिस्टीम (एव्हीएएस)

  • ई-वाहन २० किलोमीटरपेक्षा कमी वेगाने धावत असताना आवाज होतो.
  • आवाज कमी तीव्रतेचा आणि पाच फुटांच्या अंतरातील पादचाऱ्यांना ऐकू येणारा असतो.
  • ई-वाहन धावत असताना इंजिनाचा आवाज होतो तसाच हा आवाज असतो.
  • ई-वाहन सुरू केल्यानंतर तातडीने ही यंत्रणा सुरू होते.
  • वाहन बंद केल्यानंतर ही यंत्रणाही बंद होते.
  • मागील वर्षी मारूती सुझुकीने काही ई-मोटारींमध्ये वापर सुरू केला.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government decision on increasing volume of e vehicles reasons pune print news stj 05 pbs
Show comments