विविध शासकीय विभागांच्या आकडेवारीतून धक्कादायक सत्य उघड
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात रुळविण्यासाठी शिक्षण विभागाकडून खर्चिक धोरणांचा धडाका सुरू असला, तरी हे प्रयत्न सर्वार्थाने फोल ठरत असून दहावीनंतर लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य धारेपासून दूर जात असल्याचे समोर आले आहे. दहावीनंतर साधारणत: दोन लाख विद्यार्थ्यांची गळती दरवर्षी होत असल्याची धक्कादायक आकडेवारी विविध शासकीय विभागांमधून समोर आली आहे. त्यात या वर्षी गळती झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाख इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करीत आहे. तरी दहावीनंतर शिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. राज्यातील दहावीला उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वर्षांगणीक वाढत असल्याची सुखद टक्केवारी पाहायला मिळते. पण दहावीनंतरची गळतीही वाढत चालली असल्याचे भीषण रुप आकडेवारीवरून समोर आले आहे.
गेल्या तीन वर्षांच्या ‘यूडाएस’मधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी साधारण १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्राधान्याने कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखा, व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम, आयटीआय, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शेतकी पदविका अभ्यासक्रम या शाखांसाठी प्रवेश घेतात. मात्र त्यातील साधारण अडीच लाख विद्यार्थी हे दहावीनंतर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत १७ लाख २७ हजार ५५९ विद्यार्थी दहावीच्या वर्गात होते. त्यातील मार्च आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षेतून १६ लाख ३ हजार ८३५ विद्यार्थी अकरावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले. अकरावीला पारंपरिक विद्याशाखांमध्ये ११ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे सरल या प्रणालीच्या माध्यमातून समोर आले आहे. याशिवाय ७० हजार ४०५ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, १ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम, १० हजार ६४३ विद्यार्थ्यांनी शेतकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. या आकडेवारीनुसार या वर्षी साधारण २ लाख ३९ हजार विद्यार्थी हे दहावीला उत्तीर्ण होऊनही त्यांनी अकरावीला कुठेही प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले.
सरल‘सत्य’!
देशपातळीवरील शैक्षणिक स्थितीचे सांख्यिकी स्वरूपात संकलन करणाऱ्या देशपातळीवरील यूडाएस, दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेशाची स्थिती आणि या वर्षी राज्यात नव्याने अवलंबण्यात आलेल्या सरल या प्रणालीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची सांगड घातल्यानंतर गेल्या शैक्षणिक वर्षांत आणि या शैक्षणिक वर्षांत दहावीनंतर साधारण दोन लाख मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
दहावीनंतर मोठय़ा प्रमाणावर गळती होते हे खरे आहे. सरलच्या माध्यमातून प्रवेश, गळती याची नेमकी स्थिती समोर येऊ शकेल. सध्या नववीतून दहावीत जाताना होणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी काम करण्यात येत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात गळती रोखण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. २०३० पर्यंत १८ वर्षांपर्यंतचे प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात राहील असे उद्दिष्ट ठेवून शिक्षण विभाग काम करत आहे. – नंदकुमार, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग