नारायणगाव : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी सह स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढूण टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राज्य शासनाने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला आहे , कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजयंती सोहळ्यातील अभिवादन सभेत केले .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान , छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरु आहे , देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असल्याने पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपनेत्या आशाताई बुचके, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश महाबरे, राजेंद्र कुंजीर, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, तहसीलदार सुनील शेळके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शिवनेरीच्या मातीमध्ये स्वराज्याचे तेज मिळते ते तेज घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत आहोत. भारतातील राजांनी मुघलांचे मांडलीकत्व स्वीकारले होते. त्यांच्यापुढे नतमस्तक होत होते अशा काळात आई जिजाऊंनी शिवराय घडविले , मराठी मुलखात हिंदुस्थानात अनाचार ,अत्याचार चालला आहे ,या मुलखाला त्यातून बाहेर काढून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी तुझी आहे असे सांगितले. म्हणून शिवरायांनी तलवार हातात घेतली अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित केले ,मावळ्यांची फौज तयार केली व देव देश व धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापन करण्याचे आत्माभिमान जागृत करण्याचे काम केले. येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार असल्याचे स्पष्ट करून राज्यशासना मार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले .छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिप्रेत असलेले सर्वसमावेशक कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून सुराज्य तसेच लोकल्याणकारी राज्य निर्मिती करीता राज्यशासन कटीबद्ध आहे , असे प्रतिपादन किल्ले शिवनेरी वर आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. या गड किल्ल्याची देश – विदेशातही लोकप्रियता आहे .गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले .

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे सुरु आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली .

आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटाच्या प्रश्नाला गती द्यावी , शिवनेरी किल्ल्यावरील रोपवे मार्ग, जुन्नर तालुक्यातून खेतेपठार तसेच बोरघर मार्गे भीमाशंकरला जोडणारा रस्ता, आंबेगव्हाण येथील बिबट सफारी पार्क आदी विकास कामांची मागणी केली . यावेळी माजी आ. अतुल बेनके यांनी विविध मागण्या सादर केल्या .

१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. पोलीस बँड पथकाने राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जिल्हा परिषद शाळच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सादर केले.

२) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

३) मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .