संरक्षण संशोधन विकास संस्थेचा (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जामीन दिल्यास तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल, असा युक्तिवाद सरकार पक्षाचे वकील ॲड. विजय फरगडे यांनी बुधवारी न्यायालयात केला. कुरुलकरच्या जामीन मंजूर करण्यास सरकार पक्षाने विरोध केला आहे.
हेही वाचा >>> पुणे: नवले पुलाजवळ थांबलेल्या वाहनांना ट्रकची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी कुरुलकरला अटक करण्यात आली असून, तो सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कुरुलकरने त्याचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला आहे. कुरुलकरचा जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती ॲड. गानू यांनी युक्तीवादात केली आहे. कुरुलकरच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कुरुलकरच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
हेही वाचा >>> अमली पदार्थ प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना अटकेत; ललित पाटीलला पसार होण्यास मदत
विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी कुरुलकरला जामीन देऊ नये. तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. कुरुलकर प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्याला जामीन दिल्यास तपासात बाधा येईल, असे ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले. कुरुलकरचा मोबाइल संच तपासणीसाठी गुजरात येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. कुरुलकरने मोबाइलमधील विदा खोडला आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून खोडून टाकलेला विदा पुन्हा मिळवायचा आहे. याप्रकरणाचा तपास करायचा असल्याने कुरुलकरचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती ॲड. फरगडे यांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. कुरुलकरच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.