पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठविली आहे. त्यानंतर नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी ९५० काेटींचा खर्च अपेक्षित असून, हा अहवाल राज्य शासनाला सादर केल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळातील पवना धरणापासून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याच्या कामावर स्थगिती हाेती. ही स्थगिती गेल्यावर्षी शासनाने उठविली आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही याेजना झाल्यास महापालिका ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा करू शकेल. बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत हाेईल. पाण्याची गुणवत्ता चांगली राहील. पाणी शुद्धीकरणासाठी रसायने कमी लागतील. भामा आसखेड धरण परिसरातील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगावपर्यंत साडेसात किलाेमीटर १७०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे, ‘ब्रेक प्रेशर टॅक’ ते देहूपर्यंत १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे ही कामे डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण हाेतील,’ असे सिंह यांनी सांगितले.

‘शहरातील लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील लाेकसंख्येचा विचार करता पाणी पुरवठा सुधारण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ८३.५ एमएलडी क्षमतेचे ३१ जलकुंभ (पाणी टाकी) शहरातील विविध भागांत उभारण्यात येत आहेत. त्यासाठी २७२ काेटी खर्च अपेक्षित असून, डिसेंबरअखेर ही कामे पूर्ण हाेतील. दुर्गादेवी टेकडीवर पाणी साठवून ठेवण्यासाठी २८ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२७ काेटींची तरतूद करण्यात आली आहे. अनधिकृत नळजाेड शाेध माेहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घराला पाणी मीटर बसविले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची गळती, चाेरी कमी हाेईल आणि महापालिकेच्या महसुलातही भर पडेल,’ असेही आयुक्त सिंह यांनी नमूद केले.