पुणे : ‘नावाजलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त काही कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याची चर्चा झाली. पण, त्यामध्ये ज्ञानाची, व्याकरणाची किती पुस्तके खपली, ‘मी यशस्वी होणार!’ अशा स्वरूपाच्या पुस्तकांना किती मागणी होती,’ असे प्रश्न उपस्थित करून वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी मराठी माणसाचा प्रवास समूहाकडून व्यक्तिनिष्ठतेकडे सुरू झाला आहे, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. जीवनदृष्टी देण्याचे काम ग्रंथालये करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे नगर वाचन मंदिराच्या १७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते लक्ष्मण थोरात यांना वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, आशा भट्ट वेलणकर यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार आणि डॉ. राहुल देशपांडे यांना संत साहित्यविषयक ग्रंथलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी दिवेगावकर बोलत होते. परदेशातील मुलांना मराठी शिकण्यासाठी व्हिडीओ प्रकल्पाचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे आणि कार्यवाह सुवर्णा जोगळेकर या वेळी व्यासपीठावर होत्या.

परदेशातील मुलांना मराठी शिकवण्यासाठीच्या व्हिडिओ प्रकल्पाची प्रशंसा करताना आपल्या मुलांच्या मराठीचे काय, असा प्रश्न दिवेगावकर यांनी उपस्थित केला. कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता शिकवल्याशिवाय मराठी भाषा कशी शिकता येईल? ‘देणाऱ्याने देत जावे’ या विंदांच्या कवितेतून आपण दातृत्व शिकलो. ‘खबरदार जर टाच मारुनी’ ही कविता ऐकल्याखेरीज पराक्रम म्हणजे काय हे कसे कळणार, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दिवेगावकर म्हणाले, ‘न्यायाधीश असलेले महादेव गोविंद रानडे यांनी समाजशिक्षक, लोकशिक्षक, साहित्यशिक्षक आणि संस्कृती शिक्षक अशा भूमिका निभावल्या. माझे बालपण गेलेल्या मराठवाड्यात निजामाची सत्ता होती. मराठी, उर्दू, फारसी, तेलुगू, कन्नड अशा पाच भाषांचा अंमल होता. त्या वेळी गाव-खेड्यामध्ये ग्रंथालये सुरू करण्यात आली होती. स्थानिक भाषांतून शिकण्याचा हक्क या भूमिकेतून शाळा आणि ग्रंथालये अशा पूरक व्यवस्था उभ्या राहिल्या.’ भविष्यातही वाचन चळवळीसाठी काम करण्याचे बळ या पुरस्काराने दिले असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली.

लाल बत्ती भागात आमचे काम सुरू आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांना वयाच्या पन्नाशीनंतर सुरक्षित आयुष्य मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच उद्देशातून भोसरीमध्ये शिलाई मशिन युनिट कार्यरत आहे. तेथे गरजू महिला झबले-टोपडे शिवण्याचे काम करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तृतीयपंथींना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

आशा भट्ट वेलणकर, अध्यक्ष, मंथन प्रतिष्ठान

Story img Loader