पुणे : ‘लडाखच्या लोकांनी सरकारला जनाधार देऊनही उद्योगांच्या नावाखाली स्थानिक गुराख्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव आखला गेला. लडाखमधील गुराख्यांवर अन्याय करणारी सरकारची भूमिका चीनच्या फायद्याची आहे,’ अशी टीका पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी केली.
‘गांधी स्मारक निधी’तर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित तीन दिवसांच्या गांधी विचार साहित्य संमेलनाचा समारेप वांगचूक यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोेलत होते. ज्येष्ठ लेखक रामदास भटकळ, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संस्थेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन, एम. एस. जाधव, सुनील पाटील, रवींद्र धनक, रमेश आढाव आदी या वेळी उपस्थित होते.
वांगचूक म्हणाले, ‘लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. लोकांची मागणी मान्य झाली. त्यामुळे येथील लोकांनी विद्यमान सरकारला जनाधारही दिला. मात्र, लडाखच्या स्थानिक जनजातींची, लोकांची फसवणूक करण्यात आली. उद्योगांच्या नावाखाली इथल्या गुराख्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव आखला गेला. याच गुराख्यांमुळे देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. त्यांचा व्यवसायच संपुष्टात आला, तर देशाचेही मोठे नुकसान होईल. सरकारने घेतलेली ही भूमिका कुणाच्या फायद्याची आहे, असा प्रश्न पडतो. लडाखमधील गुराख्यांवर अन्याय करणारी सरकारची भूमिका चीनच्या फायद्याची आहे.’
‘देशातील सगळे राजकीय पक्ष आणि नेते महात्मा गांधी यांचा गौरव करतात. मात्र, त्यांचे विचार कोणी आचरणात आणत नाही. सर्व राजकीय पक्षांनी सोयीने गांधींचे विचार स्वीकारले आहेत. काँग्रेसनेही गांधीजींच्या विचारांना पूर्णपणे आमलात आणलेले नाही. राजकीय पक्षांनी गांधीजींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,’ अशी अपेक्षाही वांगचूक यांनी व्यक्त केली.
वांगचूक म्हणाले, ‘वीज निर्माण करण्यासाठी कोळशाऐवजी सौरऊर्जा, पाणी, वारा हे उपाय शोधले जात आहेत, पण मूळात आपल्या ऊर्जेची गरज कमी केली पाहिजे. निर्मिती वाढवण्यापेक्षा गरज कमी केली, तरच पर्यावरणाचे संतुलन राहील. तसे केले नाही, तर सौरऊर्जा, पाणी, वारा हे सुद्धा कमी पडेल.’
‘हिंसेचे उत्तर अहिंसेनेच’
‘महात्मा गांधींनी समर्पणातून आपल्याला स्वत:चा आवाज ऐकवला. आज बाहेरचा आवाज वाढला आहे. शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, महिला यांचा आपण आवाज झाला पाहिजे. हिंसेचे उत्तर अहिंसेनेच दिले पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी गांधी विचार साहित्य संमेलनात ‘माझा आतला आवाज’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.