पुणे : ओबीसी आणि मराठा आंदोलकांबरोबर सरकारची काय चर्चा झाली, हे अद्यापही स्पष्ट नाही. सरकारने त्यांना काय आश्वासन दिले, हे कळत नाही तोपर्यंत चर्चा करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीत विरोधक सहभागी झाले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले. सरकारची ही भूमिका शहाणपणाची नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : बाल न्याय मंडळातील दोन सदस्यांवर कारवाईची शिफारस, कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे श्रमिक पत्रकार संघात ज्येष्ठ पत्रकार मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या रत्न मोहन क्रोमा स्टुडिओचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि ओबीसी आंदोलकांबरोबर राज्य शासनाची कोणती चर्चा झाली? जरांगे-पाटील आणि ओबीसी समाजातील नेत्यांच्या उपोषणावेळी सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटले. पण त्यावेळी झालेली चर्चा अद्यापही लोकांसमोर आलेली नाही, याची आठवण पवार यांनी करून दिली.

हेही वाचा >>> प्राध्यापक भरती करा, ‘यूजीसी’कडून सहाव्यांदा निर्देश…

अजित पवारांबाबत पक्षस्तरावर निर्णय

लोकसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शरद पवार म्हणाले, की कुटुंबात सगळ्यांनाच जागा आहे. मात्र, अजित पवार यांना पक्षात पुन्हा घेण्याचा निर्णय वैयक्तिक पातळीवर होणार नाही. तो पक्षाचा निर्णय असेल. संघर्षाच्या आणि पडत्या काळात बरोबर राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांना त्याबाबत विचारावे लागेल, असे पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government stance unclear on reservation issue says sharad pawar zws