राज्य शासनाच्या वतीने लघुउद्योजकांना जिल्हा पुरस्कार २०२३ व जिल्हा पुरस्कार २०२४ देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र लघुउद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने लघुउद्योजकांना जिल्हा पुरस्कार २०२३ व जिल्हा पुरस्कार २०२४ देण्यात येणार आहे. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये व व्दितीय पुरस्कार १० हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम रजिस्ट्रेशन हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा. १ जानेवारी २०२० पूर्वीची नोंदणी उद्योग, आधार,उद्यम रजिस्ट्रेशन तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगाची निवड करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर, सरसंघचालक मोहन भागवत यांचा विश्वास
इच्छुकांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सरव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३९५८७,२५५३७५४१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निर्यात वाढविण्यासाठी पुढाकार
निर्यात वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून उद्योगांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्राच्या वतीने चाकण औद्योगिक क्षेत्रात नुकताच उद्योजकांशी थेट संवाद साधण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने चाकणमधील गॅब्रिएल इंडिया कंपनीत ‘महाराष्ट्र एक्स्पोर्ट कन्वेन्शन २०२४-२५’ ही कार्यशाळा झाली. यावेळी उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, सहविकास आयुक्त मित्तल हिरेमठ, भारतीय टपाल विभागाचे संदीप बटवाल, भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाचे (एफआयईओ) ऋषि मिश्रा, अपेडाच्या सुनिता सावंत, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (ईईपीसी) प्रतापसिंग भद्रा, जिल्हा उद्योग केंद्राच्या सरव्यवस्थापक वृषाली सोने आदी उपस्थित होते.