शिवरायांचे विचार जुने झाले असतील तर नवीन काय? आपण कोणी देव पाहिला नाही. छत्रपती शिवरायांचे काम पाहून देवाचा अवतारच म्हणायला हवा. त्यांचा अवमान करायचे धाडस निर्लज्ज लोक करत आहेत. स्वराज्य नसते, तर आपण आज गुलामगिरीत असतो. त्यांच्याबरोबरच्या मावळ्यांचा विसर पडून कसे चालेल? आपण स्वतःची ओळख काय सांगणार? असे प्रश्न उपस्थित करत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. आता पुन्हा कोणी अवमानकारक भाष्य केल्यास ठेचून काढण्याचा निर्धार केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…”
पुढील भूमिका २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. उदयराजे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वतःच्या कुटुंबाला कुटुंब मानले नाही, तर संपूर्ण जनता हे त्यांचे कुटुंब होते. त्यांनी त्यांच्यावेळीच लोकशाहीची संकल्पना मानली. शिवाजी महाराजांचे राज्य त्यांच्या नावाने ओळखले नाही, तर रयतेचे राज्य होते. आज काय परिस्थिती आहे? आज केवळ मीपणा आहे. व्यक्तिकेंद्रित परिस्थिती आहे. सगळीकडे त्यांचे नाव दिले जाते,पुतळे उभारले जातात, पण त्यांचे विचार आचरणात आणणार की नाही?
हेही वाचा >>>पुणे: चित्रकला शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षक अटकेत
अन्य देशांत त्यांच्या योद्ध्यांचा अपमान झाल्यास लोक पेटून उठतात. आपल्याकडे अवमान होतो. मागच्या जन्मी काही पुण्य घडले असावे, म्हणून मी या घराण्यात जन्माला आलो. माझ्याइतकचा सर्वांचा महाराजांवर अधिकार. व्हिएतनामने महाराजांचा पुतळा उभारला. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर नवे विचार कोणाचे हे सांगा. देशाला महासत्ता करायचे असल्यास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अन्य कोणाचा विचार असू शकत नाही. वयाने ज्येष्ठ असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांच्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वसामान्य माणसाला राग आला आहे. त्या व्यासपीठावर शरद पवार, नितीन गडकरी होते; पण त्यांनीही त्यांच्या भाषणात कोश्यारींच्या व्यक्तव्यावर भाष्य केले नाही. ही वृत्ती वेळीच न रोखल्यास विकृती निर्माण होईल. सर्व महापुरुषांचा सन्मान राखला पाहिजे.
हेही वाचा >>>“माझी बायको होशील का?” इन्स्टाग्राम स्टेटस ठेवणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल, पुण्यातील धक्कादायक घटना
राज्यपाल,सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केलीच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केले. त्यांनी तरी विचार केला पाहिजे. यात पक्ष, जातपात काही नाही. पावणे चारशे वर्षे होऊनही शिवरायांचे नाव काढल्यावर प्रत्येकाच्या मनात ऊर्जा निर्माण होते. कोश्यारी आणि त्रिवेदी या दोघांना हटवण्यासाठी राष्ट्रपती, पंंतप्रधानांना भेटणार आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भूमिका उघडपणे मांडली पाहिजे. दोघे काय बोलले हे सर्वांनी पाहिले. राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. कोश्यारी यांना या पदाचा सन्मान राखता येत नसल्यास त्यांची हकालपट्टी करावी, असे उदयनराजे म्हणाले.
चित्रपट व्यवस्थित सेन्सॉर होत नाही. लोक मूग गिळून गप्प का बसतात? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी तडजोडीचे राजकारण केले नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत अजिबात तडजोड होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.