राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत

पुणे : ‘महाविद्यालयांमधील विद्यार्थी या पुस्तकातून थोडे, त्या पुस्तकातून थोडे साहित्य गोळा करतात आणि त्याचा प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळवतात. महाविद्यालयांमध्ये संशोधन अगदी नावापुरतेच होते. कवी तुलसीदास, समर्थ रामदास, आइन्सस्टाइन, वर्ड्सवर्थ, सॉक्रेटिस यांनी कुठे संशोधन केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. त्यामुळे प्रशिक्षण किंवा संशोधनापेक्षा चांगला माणूस घडवण्याचे शिक्षण देण्याचा विचार होणे आवश्यक आहे,’ असे स्पष्ट मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडले.

स. प. महाविद्यालयात शैक्षणिक विकास प्रशासन केंद्रातर्फे (सेडा) उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संस्था पुरस्कार कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी कोश्यारी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, सेडाचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, केंद्राचे सचिव धनंजय कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन आदी या वेळी उपस्थित होते. सोमेश्वरनगरच्या काकडे महाविद्यालयातील डॉ. देविदास वायदंडे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील डॉ. सोनाली परचुरे यांना यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच एज्युसर्च या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. वर्षां देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

कोश्यारी म्हणाले, ‘सध्या सर्वच जण संशोधन करा, संशोधनाला प्रोत्साहन द्या असे म्हणत आहेत. पण जगातील सर्वोत्तम शिक्षकांनी कोणत्या पदव्या घेतल्या होत्या, कोणते संशोधन केले होते असा मला प्रश्न पडतो. नवीन शिक्षण पद्धतीची चर्चा होत असताना त्याचा उद्देश केवळ शिक्षण आणि नोकरी एवढाच उद्देश सिमीत आहे का? यापेक्षा वेगळा विचार आपण करणार नाही का? ठराविक चौकटीत शिक्षण न घेता, व्यापकपणे विचार झाला पाहिजे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यातूनच देशाचे नवे नेतृत्व घडणार आहे.’

राज्यपालांनी सांगूनही कार्यक्रम इंग्रजीतूनच

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीत बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते. मात्र, कार्यक्रमात सर्वाचीच भाषणे इंग्रजीत होत होती. त्यामुळे कोश्यारी यांनी प्र-कुलगुरू उमराणी यांना मध्येच थांबवून मराठीतून बोलण्यास सांगितले. त्यानुसार उमराणी यांनी मराठीतूनच भाषण केले. मात्र, उर्वरित कार्यक्रम इंग्रजीतच झाला.