पुणे : जगातील अनेक राष्ट्रात विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्विकारण्याची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी मांडले. क्षेत्र भेट, ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळ, उद्यान भेट असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी यांच्यातर्फे  लोणावळा येथे आयोजित शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात बैस बोलत होते.  मिशन मनरेगाचे व्यवस्थापक नंद कुमार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, वेधचे समन्वयक निलेश घुगे या वेळी उपस्थित होते. रोहिणी पिंपळखेडकर यांच्या ‘वेध कृती संकलन’, ‘स्पोकन इंग्लिश वेध कृती’, केवरा सेन यांच्या ‘बेसिक जपानी भाषा’ या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमात झाले.

हेही वाचा >>>‘कसली रे कोयता गँग, यांचा सुपडाच साफ करतो’; अजित पवारांची पुण्यातील गुन्हेगारांना तंबी

बैस म्हणाले, की जगातील अनेक राष्ट्रात विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. समूहामध्ये विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विस्तार होतो, त्यांच्यात एकत्रितपणे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळामुळे विजय आणि पराभव सहजतेने पचवण्याची क्षमता निर्माण होते. मुलांना मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नव्या गोष्टींबाबत विषयी उत्सुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल.

शिक्षकांनी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थी सक्षम होणे गरजेचे आहे. २१ व्या शतकात आवश्यक कौशल्य त्यांने संपादन करावे म्हणून वर्गाच्या आत आणि बाहेरच्या शैक्षणिक प्रक्रियेत बदल करावे लागतील.  शिक्षणात तंत्रज्ञानाच्या समावेशाने विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वैयक्तिक अध्ययनासाठी करणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>द्वेषातून कारवाई केली जात असल्याचा रोहित पवार यांचा हल्लाबोल; तुरूंगात टाकले जाण्याची शक्यता केली व्यक्त

शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. पटसंख्या कमी असलेल्या शाळेत मुले अधिक असलेल्या शाळेपेक्षा  विद्यार्थ्यांची प्रगती कमी असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच मुले समूहात राहून अधिक चांगल्याप्रकारे शिकतात. विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी  प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor ramesh bais opinion on homework for students pune print news ccp 14 amy